• Wed. Jan 8th, 2025
    कराडनं वापरलेल्या कारचं नवं कनेक्शन समोर; आव्हाडांनी क्रोनोलॉजीच सांगितली; एक एक कडी जोडली

    बीडच्या केजमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमधील आरोपी वाल्मिक कराड ३१ डिसेंबरला सीआयडीच्या मुख्यालयात शरण आला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: बीडच्या केजमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमधील आरोपी वाल्मिक कराड ३१ डिसेंबरला सीआयडीच्या मुख्यालयात शरण आला. २२ दिवसांपासून त्याचा शोध तपास यंत्रणांकडून घेतला जात होता. पण तो कोणाच्याच हाती लागला नाही. ३१ डिसेंबरच्या दुपारी एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा स्कॉर्पियोमधून त्यानं सीआयडी मुख्यालय गाठलं. गेल्या आठवड्याभरापासून ही कार चर्चेत आहे.

    कराडनं आत्मसमर्पणावेळी वापरलेली कार शिवलिंग मोराळे नावाच्या व्यक्तीची आहे. तो मंत्री धनंजय मुंडे आणि त्याचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचा निकटवर्तीय आहे. तो मूळचा बीडचा रहिवासी आहे. सरकारी कामांची कंत्राटं घेण्याचं काम तो करतो. कराडसोबतचे त्याचे फोटो समोर आलेले आहेत. आपण पुण्यात असताना कराड अचानक एका चौकात आपल्याला दिसले. त्यांनी मला हात दाखवला. माझ्याकडे लिफ्ट मागितली. मग मी त्यांना सीआयडी मुख्यालयात घेऊन आलो, अशी फिल्मी कहाणी मोराळेंनी सांगितली.
    लग्नाच्या वाढदिवशी विवाहाच्या ड्रेसमध्येच आयुष्य संपवलं; VIDEO करुन आप्तांना शेवटची विनंती
    शरणागती पत्करताना कराडनं वापरलेली कार उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यातही होती, असा दावा याआधी भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शपचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेली एक्स पोस्ट आणि त्यासोबतचे फोटो लक्षवेधी ठरत आहेत. आव्हाड यांनी त्यांच्या पोस्टमधून संपूर्ण क्रोनोलॉजीच मांडली आहे.

    आव्हाडांचं ट्विट जसंच्या तसं-
    ‘शिवलिंग मोराळे हा MH 23 BG 2231 या गाडीचा मालक. त्याचा हा फोटो ! जेव्हा ही गाडी मोराळेने घेतली तेव्हा त्या गाडीची पुजा करतानाचा हा फोटो आहे. आता ही पुजा कोण करतंय, हे स्पष्ट दिसतच आहे.
    आता आपण या फोटोवरून एक एक कडी जोडत जाऊ या… सुरूवातीला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ताफ्यात MH 23 BG 2231 ही गाडी दिसते. त्यानंतर या गाडीचा मालक शिवलिंग मोराळे अजितदादांपासून जवळचे अंतर राहून उभा राहतो. शेवटी ज्या गाडीतून वाल्मिक कराड हा सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करतो; ती गाडी देखील MH 23 BG 2231 हीच असते. अन् या गाडीत शिवलिंग मोराळे असतो. ज्या गाडीची पुजा धनंजय मुंडे करतात; जी गाडी अजितदादांच्या ताफ्यात वापरली जाते अन् ज्या गाडीतून वाल्मिक कराड शरणागतीसाठी येतो, त्या गाडीचा मालक शिवलिंग मोराळे म्हणतो, “वाल्मिकने हात दाखवला म्हणून लिफ्ट दिली”
    वा… वा, सारे चित्र स्पष्ट आहे. तरीही, नरो वा कुंजरो वा… अशीच भूमिका तपास यंत्रणांची आहे.’

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed