मुबंई, दि. ०६ : एन.डी. स्टुडिओचे अद्ययावतीकरण करुन तेथे चित्रपट निर्मिती व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने त्या क्षेत्रातील तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करावे. व्यावसायिक कृती आराखडा तयार करुन एनडी स्टुडिओची आर्थिक सक्षमता वाढविण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.
एन.डी. स्टुडिओच्या अद्ययावतीकरणाच्या कामासंदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली. यावेळी आमदार महेश बालदी, सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह फिल्मसिटी तसेच एन.डी. स्टुडिओचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री. शेलार म्हणाले की, मराठी निर्माते, कलाकार, तंत्रज्ञ यांना सहाय्यक ठरतील अशा पूरक सुविधा उपलब्ध करुन देण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य शासनाची आहे. त्यादृष्टीने एन.डी. स्टुडिओचे अद्ययावतीकरण हे भविष्यातील मनोरंजन क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन करण्यात यावे. याच्या परिपूर्ण आराखडा निर्मितीसाठी तज्ज्ञ सल्लागारांचे मार्गदर्शन घेण्यात यावे. या स्टुडिओच्या माध्यमातून अधिकाधिक रोजगार संधी निर्माण करण्यावर भर देताना त्यात स्थानिकांना प्राधान्य द्यावे. तसेच या स्टुडीओत उपलब्ध रिकाम्या जागेचा अधिक योग्य वापर करण्याच्या दृष्टीनेही नियोजन करावे. या ठिकाणी बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रामुख्याने मराठी सिरियल्स, सिनेमा, वेब सिरीज ओटीटी माध्यमात काम करणाऱ्या निर्माते, कलाकारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशा सूचना मंत्री श्री. शेलार यांनी दिल्या.
०००
वंदना थोरात/विसंअ/