Raigad News : अलीकडे सागरी दुर्घटना घडण्याचे प्रमाण वाढले आहे. गेटवे ऑफ इंडिया जवळ प्रवासी बोट बुडाल्याची घटना ताजी असताना आता रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या साखर जवळ देखील मंगळवारी पहाटे बोट बुडल्याची घटना घडली आहे.
अलिबाग तालुक्यातील साखर समुद्रकिनाऱ्यावर मच्छीमारी करण्यासाठी ही बोट गेली होती, याचवेळी बिघाड झाल्याने अचानक गळती लागली व बोट पाण्यात बुडाली. बोटीमध्ये एकूण १५ खलाशी असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेचे साक्षीदार असलेले जनार्दन नाखवा यांनी बोट दुर्घटनेबद्दल माहिती दिली आहे.
नाखवा म्हणाले, बुडालेल्या बोटीला दुसऱ्या बोटीने समुद्र किनाऱ्यावर आणण्यात आले आहे. बोटीमधील सर्व सामान खराब झाले आहे. तसेच काही सामान वाहून गेल्याने बोट मालकाचे व खलाशांचे सुमारे १२ लाखांचे नुकसान झाले आहे. सध्या या बोटीतील पाणी काढण्याचे काम पंपाने सुरू आहे.