Beed News : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमधील आरोपी वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. आत्मसमर्पण करण्याच्या अगोदर त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला.
रात्री उशिरा केज न्यायालयात वाल्मिक कराडला हजर करण्यात आले. पुण्यात आत्मसमर्पण केल्यानंतर संध्याकाळी कराडला बीडला आणले गेले. सरकारी वकिलाकडून वाल्मिक कराडची 15 दिवसाची पोलिस कोठडी मागण्यात आली. यासोबतच काही आरोपही करण्यात आले. सीआयडीने वाल्मिक कराडबद्दल मोठा खुलासा केला. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याच्या नजरा होत्या. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी गंभीर आरोप कराडवर आहेत.
Walmik Karad Surrender: CID ऑफिसबाहेर बंदोबस्तात वाढ, कार चकवा देत भरधाव वेगानं आत; कराड शरण येताना नाट्यमय घडामोडीकोर्टात वाल्मिक कराड यांना पंधरा दिवसांची पोलिस कोठडी द्या, अशी मागणी सीआयडीकडून करण्यात आली. सीआयडीकडून मोठा खुलासा करत म्हणण्यात आले की, मोबाईलवरील संभाषण हे कराडच आहे का?, याची तपासणी करायची आहे. यामुळे पंधरा दिवसांची पोलिस कोठडी हवी. संतोष देशमुख प्रकरणात खरोखरच वाल्मिक कराडचा हात आहे का? याचाही तपास केला जाईल.
आवादा कंपनीकडून वाल्मिक कराडने दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून वाल्मिक कराड 22 दिवसांपासून फरार होता. त्याच्या शोधात अनेक पथके तयार करण्यात आली होती. मात्र, शेवटी वाल्मिक कराडने स्वत: आत्मसमर्पण केले. त्यापूर्वी तो मध्य प्रदेशच्या उज्जैन येथे दर्शनासाठी गेला होता. 13 डिसेंबर रोजी त्याने सोशल मीडियावर फोटो देखील शेअर केले होते.