• Fri. Jan 10th, 2025

    शहर पाणीपुरवठा योजना; संयुक्त तांत्रिक पाहणी करुन अहवाल सादर करावा- इ.मा.व.कल्याण मंत्री अतुल सावे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Dec 30, 2024
    शहर पाणीपुरवठा योजना; संयुक्त तांत्रिक पाहणी करुन अहवाल सादर करावा- इ.मा.व.कल्याण मंत्री अतुल सावे – महासंवाद

    छत्रपती संभाजीनगर, दि.३०(जिमाका):-राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोनही विभागांनी पैठण ते छत्रपती संभाजीनगर रस्ता व त्याच रस्त्यालगत होत असलेल्या शहर पाणीपुरवठा योजनेच्या कामाची मनपा समवेत संयुक्त तांत्रिक पाहणी करावी व अहवाल सादर करावा. पहिल्या टप्प्यात मार्चमध्ये पाणीपुरवठा  सुरु होईल असे नियोजन करावे, असे निर्देश इतर मागास वर्ग व बहुजन कल्याण, तसेच दुग्धविकास व उर्जा नुतनीकरण मंत्री अतुल सावे यांनी आज दिले.

    जिल्हाधिकारी कार्यालयात शहर पाणीपुरवठा योजनेच्या प्रगतीबाबत आज बैठक पार पडली. राज्याचे इतर मागास वर्ग व बहुजन कल्याण, तसेच दुग्धविकास व उर्जा नविनीकरण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान पाटील भुमरे, खासदार डॉ. कल्याण काळे, विधानसभा सदस्य आ. अनुराधा चव्हाण, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, मजिप्राच्या मुख्य अभियंता मनिषा पलांडे, कार्यकारी अभियंता दीपक कोळी, मनोज पाठक मुख्य अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अनिकेत कुलकर्णी, जेव्हीपीआर कंपनीचे जी.मेहंदर, खलील अहमद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता रवींद्र इंगोले, महानगरपालिकेचे अभियंता ए. बी. देशमुख, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता किरण पाटील यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी पाणीपुरवठा योजनेचे कामकाज करणारे कंत्राटदार आणि शेतकरी बैठकीस उपस्थित होते.

    बैठकीत प्रारंभी मजीप्रातर्फे माहिती सादर करण्यात आली. त्यानुसार, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत शहर पाणीपुरवठा योजनेला २०१९ मध्ये मान्यता मिळाली. या योजनेचा अमृत २.० योजनेत समावेश करुन त्यास सुधारीत मंजूरी घेण्यात आली. आता पर्यंत १८०८ कोटी ३९ लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला असून आतापर्यंत १५८३ कोटी ३२ लक्ष रुपये इतका निधी खर्च झाला आहे.

    याअंतर्गत उद्भव विहिरीच्या (जॅकवेल) उभ्या भिंतीचे काम ११.९ मिटर उंचीपर्यंत पूर्ण झाले असून वर्तुळाकार भिंतीचे २२.७ मिटर उंचीचे काम पूर्ण झाले आहे. उपांग कामांमध्ये पुलाचे काम ७५ टक्के पूर्ण आहे. पाईपलाईन अंथरण्याचे काम ८८ टक्के पूर्ण झाले आहे.जलाभिसरण कारंजाचे आरसीसी काम ९० टक्के, आऊटलेट चेंबर ७२ टक्के पूर्ण, सीएलफचे काम ९५ टके पूर्ण,पम्प हाऊस व केमिकल हाऊसचे काम अनुक्रमे ७० व ७५ टक्के पूर्ण झाले आहे. या शिवाय ४७ उंच जलकुंभ व ३ बैठे जलकुंभ असे एकूण ५० जलकुंभ तयार करण्यात येणार आहेत. त्यातील ७ उंच जलकुंभ पूर्ण झाले आहेत. २ बैठे जलकुंभ पूर्ण झाले आहेत. उर्वरीत जलकुंभ ९० टक्क्यांहून अधिक कामे पूर्ण झाली आहेत. पूर्ण झालेल्या जलकुंभांच्या कार्यकक्षेत घरगुती जोडण्यांचे कामेही सुरु आहेत,अशी माहिती देण्यात आली.

    राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत रस्त्याच्या कामाबाबत माहिती सादर करण्यात आली. या योजनेसाठी पैठण ते छत्रपती संभाजीनगर या रस्त्यालगत ८ मिटर अंतरापर्यंत अस्तित्वातील १२०० मिमी पाईप लाईनच्या बाजूने नवीन २५०० मिमी पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु आहे. जमिनीखाली मंजूर पाईप लाईन टाकल्यास व त्यावरुन  रस्ता गेल्यास भविष्यात पाईपलाईनची देखभाल करण्याविषयी निर्माण होऊ शकणाऱ्या प्रश्नांबाबत व याबाबतच्या तांत्रिक शक्यतांवर चर्चा करण्यात आली.

    श्री. सावे म्हणाले की, रस्त्याचे व जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर जलवाहिनीची देखभाल दुरुस्ती करतांना रस्ता खोदावा लागू नये. यासाठी कार्यान्वयन यंत्रणा व मनपा या तिघाही यंत्रणांनी मिळून संयुक्त तांत्रिक पाहणी करावी. येत्या चार दिवसात त्याचा अहवाल सादर करावा.  येत्या मार्च पर्यंत पहिल्या टप्प्यातील २०० दलघमी पाणी शहराला पुरवठा करावे,असे निर्देश श्री. सावे यांनी दिले. तसेच या कामाची हायड्रॉलिक तसेच  रेडिओग्राफिक चाचणी घेतल्यानंतरच संबंधित ठेकेदाराचे देयक अदा करावे,अशी सुचनाही श्री. सावे यांनी दिली.

    ही योजना आगामी ५० वर्षांसाठी तयार करण्यात आली असून आगामी कालावधीत कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नये याबाबत उपाययोजना कराव्या. लोकांना पाणी मिळावे, पैठणकडे जाणारी तसेच बिडकीन व चितेगाव या रस्त्यालगतच्या गावातील रहदारी सुरळीत व्हावी, यादृष्टीने उपाययोजना कराव्या,असे निर्देश खा. संदिपान भुमरे यांनी दिले.

    जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की. कार्यान्वयन यंत्रणांनी आपापसात समन्वय राखून काम वेळेत पूर्ण करावे.

    मनपा आयुकत जी.श्रीकांत यांनी या योजनेचे काम पूर्ण करुन शहरवासियांना पाणीपुरवठा करणे हेच मनपाचे प्राधान्य असून त्यासाठी सर्व कार्यान्वयन विभागांनी मिळून संयुक्त प्रयत्न करावे,असे सांगितले.

    ०००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed