• Fri. Jan 3rd, 2025
    सुविधांचा अभाव,अती  रक्तस्त्राव,बाळाला जन्म देऊन मातेचा दुर्दैवी अंत

    | Contributed byआशिष मोरे | | Updated: 28 Dec 2024, 12:40 pm

    Palghar News: प्रसूती झाल्यानंतर रक्तस्त्राव न थांबल्याने मातेचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागात अजूनही अद्यावत आरोग्य सुविधा, सक्षम आरोग्य यंत्रणांचा असलेला अभाव, यामुळे होणारी रुग्णांची हेळसांड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नमित पाटील, पालघर: गरोदर मातेची प्रसूती झाल्यानंतर रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मोखाडा येथे घडली आहे. आशा नंदकुमार भुसारे (वय २२) असे मृत मातेचे नाव आहे. बाळाला जन्म देऊन मातेचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे मोखाडा परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहेत.

    आशा नंदकुमार भुसारे (वय २२) या पालघर जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या मोखाडा तालुक्यातील मोऱ्हांडा ग्रामपंचायत हद्दीतील कोलद्याचा पाडा येथील रहिवासी असून त्यांना प्रसूती वेदना सुरू झाल्याने २४ डिसेंबरला पहाटे तीन वाजताच्या सुमारास मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास गरोदर महिलेची प्रसूती झाली. मात्र प्रसूत झाल्यानंतर महिलेचा रक्तस्त्राव थांबत नसल्याने तिला उपचारासाठी जव्हार येथील पतंगशाह कुटिर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. तेथे महिलेला ४ बाटल्या रक्त चढवले व उपचार देखील करण्यात आले.

    मात्र मातेची प्रकृती सुधारत नसल्याने दुपारी दीड वाजताच्या सुमरास नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटल येथे तिला पाठवण्यात आले. महिलेला नाशिक येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. मृत मातेचे बाळ सुखरूप असून मातेचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागात अजूनही अद्यावत आरोग्य सुविधा, सक्षम आरोग्य यंत्रणांचा असलेला अभाव, यामुळे होणारी रुग्णांची हेळसांड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

    पतीने केला आरोप

    “पत्नीची डिलिव्हरी नॉर्मल झाली, मात्र तिच्यावर चुकीच्या पद्धतीने व वेळेत उपचार न झाल्याने रक्तस्त्राव झाल्याचा आरोप महिलेच्या पतीने केला आहे. वेळीच नाशिक येथील सिव्हिल रुग्णालयात तिला दाखल केले असते तर उपचार होऊन माझ्या पत्नीचा जीव वाचला असता. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी” अशी मागणी मृत महिलेचे पती नंदकुमार भुसारे यांनी केली आहे.

    वैद्यकीय अधीक्षकांची प्रतिक्रीया

    “गर्भवती महिलेची प्रसूती झाल्यानंतर काही वेळाने गर्भपिशवी कडक होणे आवश्यक असते अन्यथा रक्तस्त्राव होतो. या मातेची गर्भपिशवी कडक न झाल्याने तिला रक्तस्त्राव सुरू झाला तो थांबवण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न केला. परंतु रक्तस्त्राव थांबत नसल्याने गर्भपिशवीची शस्त्रक्रिया करून गर्भपिशवी काढून टाकणे आवश्यक होते. या अद्ययावत शस्त्रक्रिया सुविधा रुग्णालयात उपलब्ध नसल्याने महिलेला नाशिक येथील सिव्हील हॉस्पिटलला पाठवण्यात आले. मात्र रस्त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला” अशी प्रतिक्रिया मोखाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भरत महाले यांनी दिली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed