• Sat. Jun 6th, 2026
    Satara News : महाराष्ट्रावर शोककळा, साताऱ्याचे जवान बाळकृष्ण निकम यांना भारत-चीन सीमेवर वीरमरण, देशसेवा करताना शहीद

    साताऱ्याचे सुपुत्र बाळकृष्ण निकम भारत-चीन सीमेवर देशसेवेचं कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं आहे. बाळकृष्ण यांना वीरमरण आल्याचं वृत्त समजल्यानंतर पिंपळोशी गाव शोकसागरात बुडालं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरविणारी घटना समोर आली आहे. सिक्कीममध्ये पहाडी प्रदेशात तैनात असलेला पाटण तालुक्यातील जवान शहीद झाला आहे. बाळकृष्ण विलासराव निकम (वय ४१), असे हुतात्मा जवानाचे नाव आहे. ते पाटण तालुक्यातील पिंपळोशी गावचे सुपुत्र होते. सेवानिवृत्तीला अवघे दीड वर्ष बाकी असताना त्यांना वीरमरण आल्याने कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवाराला जबर धक्का बसला आहे. हुतात्मा जवान बाळकृष्ण निकम यांचे प्राथमिक शिक्षण मेष्टेवाडी जिल्हा परिषद शाळेत झाले होते. पाटण येथील कै. ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर बाळासाहेब देसाई महाविद्यालयात बी. कॉमच्या दुसऱ्या वर्षाला असतानाच २००३ साली सांगली येथे ते सैन्य दलात भरती झाले होते. पुणे येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इंजिनिअर रेजिमेंटमध्ये हवालदार म्हणून ते रूजू झाले होते. त्यांनी सियाचीन, लडाखसारख्या प्रतिकूल आणि अतिसंवदेनशील ठिकाणी सेवा बजावली.

    सैन्य दलात त्यांची २३ वर्षे सेवा झाली होती. पुढच्या वर्षी ते सेवानिवृत्त होणार होते. तत्पूर्वीच त्यांना हौतात्म्य आले. सिक्कीमच्या अतिदुर्गम आणि २ हजार मीटरहून अधिक उंचीवर असलेल्या शेरावानीच्या पहाडी परिसरात ते रेडीओ ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. त्याठिकाणी ऑक्सिजन अभावी गुदमरून त्यांना वीरमरण आले.

    आपल्या सुपुत्राला वीरमरण आल्याची बातमी समजताच पिंपळोशी गाव आणि संपूर्ण पाटण तालुका शोकसागरात बुडाला. शहीद जवान बाळकृष्ण निकम यांचे पार्थिव शनिवारी विमानाने पुणे आणि तेथून लष्करी रुग्णवाहिकेने मुळगावी पिंपळोशी येथे पार्थिव आणले जाणार आहे. गावातून अंत्ययात्रा काढल्यानंतर शासकीय इतमामात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

    बाळकृष्ण निकम यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, बहिण, भाऊ भावजय आणि पुतणे, असा परिवार आहे. त्यांचे चुलते सैन्य दलात होते. त्यांचीच प्रेरणा घेवून आपणही सैन्य दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते भरती झाले होते. कुटुंब स्थिरस्तावर होत असतानाच नियतीने त्यांना हिरावून नेले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा