- विविध कार्यकारी सेवा सोसायटीला ग्रामीण भागात विविध सेवा पुरविण्याची जबाबदारी
- गाव पातळीवर दुग्ध संस्थांना पाठबळ देवून मराठवाड्यात दुग्ध व्यवसायाला गती देणार
- सहकारी संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज
लातूर, दि. २५ : केंद्र शासनाच्या सहकार विभागाने सुरू केलेल्या ‘सहकारातून समृद्धी’ अभियानांतर्गत देशात दहा हजार बहुद्देशीय प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, दुग्ध संस्था, मत्स्य व्यवसाय संस्था स्थापन झाल्या आहेत. या संस्थांचा केंद्रीय सहकार मंत्री अमीत शाह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथून शुभारंभ होत आहे. या अभियानांतर्गत राज्यातही गाव पातळीवर सहकारी संस्थांचे सक्षमीकरण करून, त्या संस्थांच्या माध्यमातून पतपुरवठ्यासह नागरिकांना अधिकाधिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. तसेच या नागरिकांना सहकार चळवळीशी जोडून घेतले जाणार असल्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज येथे सांगितले.
‘सहकारातून समृध्दी’ अंतर्गत देशपातळीवर आयोजित दहा हजार नवनिर्मित बहुद्देशीय प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, दुग्ध संस्था, मत्स्य संस्थांच्या शुभारंभ कार्यक्रमानिमित्त लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विशेष राज्यस्तरीय कार्यक्रमात ना. पाटील बोलत होते. नवी दिल्ली येथून केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण यावेळी दाखविण्यात आले. सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, नाबार्डच्या मुख्य महाव्यवस्थापक रश्मी दराद, लातूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, लातूर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष अशोक गोविंदपूरकर, मजूर सहकारी संस्था फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप नागराळकर, अपर निबंधक राजेश सुरवसे, नाबार्डचे प्रदीप पराते, विभागीय सहनिबंधक सहकरी संस्था सुनील शिरापूरकर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संगमेश्वर बदनाळे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक प्रमोद पाटील, जिल्हा विशेष लेखा परीक्षक उमाकांत पवार यावेळी उपस्थित होते.
सहकार चळवळीमुळे आपल्या राज्याची प्रगती झाली असून सहकारी साखर कारखाने, सहकारी पतपुरवठा संस्था यामुळे राज्यातील अर्थकारणाला गती मिळाली. सहकार चळवळ अधिक बळकट करून गाव पातळीवर सहकारी संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यासाठी केंद्र शासनाने सहकारातून समृद्धी अभियान हाती घेतले आहे. गाव पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सोसायटीने पतपुरवठा करण्यासोबतच ग्रामीण भागातील नागरिकांना विविध सेवा पुरविण्यासाठी पुढाकार घ्यावा. यामुळे जास्तीत जास्त लोकांना सहकार चळवळीशी जोडून घेता येईल. तसेच सहकारी संस्थांच्या उत्पन्नात भर पडून त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल, असे ना. पाटील यावेळी म्हणाले.
राज्यातील अनेक भागात सहकारी दुग्ध संस्थांच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायाचा विकास झाला आणि शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण झाले. याच धर्तीवर मराठवाड्यातही सहकारी दुग्ध संस्थांच्या उभारणीला पाठबळ देवून दुग्ध व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न केले जातील. यासाठी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आणि मदर डेअरी यांचे सहकार्य घेतले जाईल, असे सहकार मंत्री ना. पाटील म्हणाले.
सहकार संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज
महिलांनी आज सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आता सहकारी संस्थांमध्येही महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज आहे. महिलांकडे असलेल्या आर्थिक बचतीच्या कौशल्याचा सहकारी संस्था चालविता नक्कीच उपयोग होईल, असा विश्वास ना. पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
सहकार चळवळ म्हणजे प्रगतीचा आत्मा आहे. सहकारातून समृद्धी अंतर्गत जिल्ह्यात स्थापन होत असलेल्या सहकारी संस्थांमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल. सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातूनही विविध उपक्रम राबविण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
गाव पातळीवरील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारच्या सहकार विभागामार्फत जवळपास १६० विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या योजनेतून देशातील ६३ हजार सहकारी संस्थांचे संगणकीकरण करण्यात आले असून यामध्ये महाराष्ट्रातील सुमारे १२ हजार संस्थांचा समावेश आहे. विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या माध्यमातून सामूहिक सुविधा केंद्र, दुग्ध संस्था, गोडवून आदी सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील जास्तीत जास्त आर्थिक व्यवहार विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या माध्यमातून व्हावेत, यामाध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये नाबार्ड मार्फतही सहाय्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे नाबार्डच्या मुख्य महाव्यवस्थापक रश्मी दराद यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय सहनिबंधक सुनील शिरापुरकर यांनी केले. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात राज्यातील १५ विविध नवनिर्मित संस्थांना यावेळी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. केंद्र सरकारच्या सहकार विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीविषयी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संगमेश्वर बदनाळे यांनी माहिती दिली.
०००