Devendra Fadnavis on congress : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षावर देशाची आणि संसदेची दिशाभूल केल्याचा आरोप करत गृहमंत्र्यांच्या वक्तव्याचा अपूर्ण व्हिडिओ जारी केला असे म्हटले. मुख्यमंत्री म्हणाले, दिशाभूल करण्यासाठी काँग्रेसने हे अर्धवट विधान व्हायरल केले आहे. काँग्रेसने आपल्या कृत्याबद्दल माफी मागावी.
नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “गृहमंत्री अमित शहा यांचा अर्धवट व्हिडीओ ट्विट करून काँग्रेस संसदेचा आणि जनतेचा वेळ वाया घालवत आहेत. संसदेत बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचा पर्दाफाश केला. काँग्रेसने कसा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी ज्या पद्धतीने संविधान आणि आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न केला, ते देशातील जनतेसमोर आणले. पंतप्रधानांनी हे पुराव्यानिशी जगासमोर आणले. त्यामुळे आता काँग्रेस नाटक करण्याचा प्रयत्न करत आहे. याच काँग्रेस पक्षाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना कधीही निवडून येऊ दिले नाही. मुद्दाम त्यांना निवडणूकीत पाडले.
बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू झालेल्या इंदुमिलमध्ये स्मारकही बांधण्यात येणार आहे. त्यासाठी अनेक वर्षे आंदोलने करावी लागली. काँग्रेस सरकारने सुईच्या टोका इतकिही जागा दिली नाही, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. नरेन्द्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आणि मी मुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत दोन हजार कोटी रुपयांची जमीन राज्य सरकारला दिल्याचा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. आता त्या ठिकाणी स्मारक उभारले जात आहे, असे ते म्हणाले.
लंडनमध्ये बाबासाहेब ज्या घरामध्ये राहत होते ते घर लिलावासाठी ठेवण्यात आले होते. या घराचा लिलाव होऊ देऊ नये, अशी मागणी अनेक संघटनांनी काँग्रेस सरकारकडे केली होती. पण, त्यांनी लक्ष दिले नाही. फडणवीस म्हणाले, आमचे सरकार परत आल्यानंतर आम्ही ते घर घेतले. महू, दीक्षाभूमी, अलीपूर रोड आदी ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जपण्याचे काम भाजप सरकारने केले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या महाराष्ट्राच्या सुरक्षेबाबत केलेल्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील सर्वात सुरक्षित राज्यांपैकी एक आहे, मात्र काही लोकांना राजकारण करायचे आहे आणि समाजात द्वेष पसरवण्यासाठी अश्या प्रकारची विधाने केली जात आहेत.