Madhukar Pichad Political Career: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकर काशिनाथ पिचड (वय ८३) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ब्रेन स्ट्रोक झाल्याने त्यांनी शुक्रवारी सायंकाळी अखेरचा श्वास घेतला. जाणून घेऊयात त्यांच्या राजकीय जीवनप्रवासाबद्दल…
पिचड यांचे शिक्षण
मधुकर पिचड यांचा १ जून १९४१ साली अहिल्यानगर जिल्ह्यातील राजुरा येथे जन्म झाला. ते महादेव कोळी समाजातील आहेत. त्यांचे वडीला पेशाने शिक्षक होते.
पिचड यांनी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. यांनी आदिवासींच्या क्षेत्रात मोठे संघटन आणि काम उभे केले. आदिवासींचे आरक्षण आणि त्यावर होणारे अतिक्रमण यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. मधल्या काळात त्यांच्याभोवती अनेक वादही उभे निर्माण झाले. तालुक्यात दूध संघ, साखर कारखाना यासह विविध सहकारी संस्था त्यांनी स्थापन केल्या.
Madhukar Pichad Passes Away: भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे निधन, ८४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पंचायत समितीपासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथील पिचड यांनी जिल्हा परिषद, पंचायत समितीतून राजकारणाला सुरुवात केली. १९७२ मध्ये ते जिल्हा परिषदेवर निवडून गेले. ते अकोले पंचायत समितीचे सभापती होते. अकोले विधानसभा मतदारसंघातून पिचड १९८० ते २००४ पर्यंत सलग सातवेळा आमदार होते. १९९५ ते १९९९ या काळात त्यांनी विरोधी पक्षनेते पदाची धुरा सांभाळली. काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये आदिवासी विकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पिचड हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक होते. सुरुवातीला काँग्रेसमध्ये असणाऱ्या पिचड नंतर शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. २०१४ मध्ये त्यांनी निवृत्ती घेत मुलगा वैभव यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून वैभव निवडून आले. २०१९ ला पिचड यांनी मुलगा वैभव यांच्या उमेदवारीसाठी पवार यांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, वैभव यांचा पराभव झाला. २०२४ ला वैभव पिचड यांना उमेदवारीही मिळाली नाही.