तानाजी सावंतांचे समर्थक आणि धनंजय सावंत यांनी बंड केल्यानंतर हजारो समर्थकांसह मुंबई गाठली होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याशिवाय परत यायचेच नाही, अशी ठाम भूमिका धनंजय सावंत आणि समर्थकांनी यांनी घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भविष्यात होणाऱ्या लोकसभेची तयारी करा, तसेच योग्य ठिकाणी संधी देऊ, असे आश्वासन देऊन झालेला बंड शमवण्याचा प्रयत्न केला. धनंजय सावंत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासनावर बोळवण केल्याचे चर्चा धाराशिव जिल्ह्यात होत आहे.
सुरुवातीपासूनच धनंजय सावंत हे धाराशिव लोकसभेसाठी इच्छुक होते. त्यांनी तसा प्रचार चालू केला होता. जिल्ह्यातील अनेक गावांना, खेड्यांना, वस्त्यांना, त्यांनी भेट दिली होती. त्यांनी धाराशिव जिल्हा परिषदचे मार्फत केलेले काम, तसेच आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलेली कामे याची उजळणी करून दाखवली होती. आम्ही जे काम केले त्या कामाच्या जोरावर आम्ही तिकीट मागतोय, अशी ठाम भूमिका धनंजय सावंत यांनी ठेवली होती. लोक आम्हाला सहकार्य करतील, मतदार मला मतदान करतील, असा आशावाद त्यांना होता. परंतु धाराशिव लोकसभेची जागा शिवसेना शिंदे गटाला न सुटता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुटली. तेथेच पिठाचा खडा पडला.
अर्चना पाटील यांचे नाव जाहीर होताच भूम, परंडा, वाशी या तीन तालुक्याबरोबरच जिल्ह्यातील इतर शहर आणि गावांमध्ये सावंत समर्थकांनी अर्चना पाटील यांना विरोध करायला सुरुवात केली. तर काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले. तर काही कार्यकर्त्यांनी आपल्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला. त्याची होळी सुद्धा केली होती. हजारो सावंत समर्थक हे सोनारी येथील भैरवनाथ शुगर कारखाना येथे एकत्र जमले होते. त्यांनी धनंजय सावंत यांना अपक्ष उमेदवारी दाखल करा आम्ही आपणास निवडून आणू, अशा घोषणाही दिल्या होत्या. पक्षाचा आदेश काय येतो हे पाहण्यासाठी सावंत समर्थक दोन दिवस वाट पाहत थांबले होते. नंतर त्यांनी मुंबई गाठली. हजारो सावंत समर्थक धनंजय सावंतासह मुंबईत दाखल झाले आणि मुख्यमंत्रीची त्यांनी भेट घेतली.
अर्चना पाटील यांचा जो निर्णय घेतला आहे तो रद्द करून धनंजय सावंत यांना पुन्हा उमेदवारी द्या, अशी मागणी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनंजय सावंत आणि त्यांच्या समर्थकांना केवळ आश्वासन दिले. आश्वासन पलीकडे त्यांनी काहीच दिले नाही. त्यामुळे सावंत समर्थकांमध्ये तीव्र नाराजी होती. उद्या १२ एप्रिल असून १२ एप्रिलपर्यंत आम्ही वरिष्ठांच्या निर्णयाची वाट पाहू नाही तर, आम्ही आमचा निर्णय घेऊ, असे ठाम भूमिका सावंत समर्थक आणि धनंजय सावंत यांनी घेतली आहे.
आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत हे आपले पुतणे धनंजय सावंत यांना धाराशिव लोकसभेची उमेदवारी मिळवून देण्यास कमी पडले असे दिसून येते. त्यांचं राजकीय वजन कमी झाल्याचे यातूनच स्पष्ट दिसून येते? उद्या १२ तारीख असून उद्या काय निर्णय आहे, याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. जिल्ह्याचे राजकारण आणि लोकसभा हे उद्या १२ तारखेनंतर स्पष्ट दिसून येईल. आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत धनंजय सावंत हे अर्चना पाटील ला मदत करतील का हे पुढील काही दिवसात दिसून येईल.