सांगली लोकसभेच्या जागेवरुन खऱ्या अर्थाने आमनेसामने आलेत ते विश्वजित कदम आणि उद्धव ठाकरे. याच विश्वजीत कदम यांच्या पळूस कडेगाव मतदारसंघात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या उमेदवाराची जी अवस्था झाली होती त्याची एक आकडेवारी समोर येत आहे.
२००९ ला काँग्रेसकडून पतंगराव कदम उमेदवार होते. काँग्रेसमधील बंडखोर पृथ्वीराज देशमुखांना महायुतीचा पाठिंबा होता. २०१४ च्या विधानसभेला भाजप, शिवसेना स्वतंत्र लढली. २०१४ मध्ये पतंगराव कदम जवळपास एक लाख १२ हजार मतं घेऊन विजयी झाले, तर भाजप उमेदवार पृथ्वीराज देशमुख ८८ हजार मतं घेऊन दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले. तर शिवसेना उमेदवाराला दोन हजार २०० म्हणजे एक टक्का मतं मिळाली.
२०१९ ला पळूसच्या जागेवरून भाजप-शिवसेनेत संघर्ष पाहायला मिळाला. शिवसेनेने भाजकडून जागा खेचून घेतली, पण विश्वजीत कदम ८३ टक्के मतं घेऊन १ लाख ७१ हजार मतांनी विजयी झाले. नोटाला २० हजार ६०० मतं मिळाली, तर शिवसेना उमेदवार संजय विभुतेंना फक्त ८ हजार ९०० मतं मिळाली होती.
विश्वजीत कदमांच्या विरोधकांनीही शिवसेनेला नाकारून नोटाला पसंती दिली. २०१४ च्या विधानसभेला तर शिवसेनेच्या अनेक उमेदवारांना डिपॉझीटही वाचवता आलं नाही. तर २०१९ मध्ये भाजपसोबत असूनही अशीच परिस्थिती राहिली.
२०१४ च्या निवडणुकीत सांगलीतील शिवसेना उमेदवारांना मिळालेली मतं
– तासगावमध्ये आर. आर. पाटील एक लाख ८ हजार मतांनी विजयी, तर शिवसेना उमेदवाला १९६७ मतं म्हणजेच एक टक्केही मतदान झालं नाही
– जत विधानसभेत भाजपचे विलासराव जगताप ७२ हजार मतांनी विजयी, तर शिवसेना उमेदवाराला फक्त १९२८ म्हणजे १ टक्के मतं
– मिरज विधानसभेत भाजपचे सुरेश खाडे ९३ हजार मतांनी विजयी, तर शिवसेना उमेदवाराला २० हजार मतं
– सांगली विधानसभेत भाजपचे सुधीर गाडगीळ ८० हजार मतांनी विजयी, तर शिवसेना उमेदराला ३४ हजार मतं
– मात्र, खानापूर आटपाडीमध्ये २०१४ आणि २०१९ लाही शिवसनेचे अनिल बाबर विजयी
– सांगलीतील शिवसेनेचे पहिले आमदार म्हणून अनिल बाबरांच्या नावे रेकॉर्ड
– दिवंगत आमदार अनिल बाबार यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्याने ठाकरेंची पाटी सांगलीत पुन्हा कोरी
– मात्र, २००९ च्या विधानसभेला खानापूरमध्ये शिवसेना उमेदवाराला २७०० म्हणजे १.५ टक्के मतं मिळाली.
आजवरच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला अपवादात्मक यश मिळालं. अनिल बाबर हेही स्वत:च्या ताकदीवर निवडून येणारे आमदार म्हणून ओळखले जायचे. मात्र, ज्या मतदारसंघात ठाकरेंच्या उमेदवारांना पराभव आणि डिपॉझीट जप्तीची वेळ आली. त्याच मतदारसंघात ठाकरेंनी काँग्रेसला शह देऊन उमेदवार उतरल्याने काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग दुखावल्याचं कार्यकर्ते सांगतात. हीच आकडेवारी समोर ठेवून विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांचे कार्यकर्ते ठाम भूमिका घेण्याची मागणी करत आहेत.