Nanded Student: रात्री उशिरा ग्रामीण पोलिसांनी तक्रारीवरून जीवन घोगरे पाटील यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि ॲट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा गायकवाड ही हडको येथील शामराव कदम होमिओपॅथिक महाविद्यालयातील द्वितीय वर्षाचं शिक्षण घेत होती. आई वडील वीट भट्टीवर मजुरीचे काम करतात. महाविद्यालयाच्या काही अंतरावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) चे प्रदेश चिटणीस जीवन घोगरे पाटील यांचं निवासस्थान आहे. त्यांच्या इमारतीत त्यांनी कॉट बेसिसवर सुरू केलेले वसतीगृह आहे. मागील दोन वर्षांपासून आकांक्षा ही कॉट बेसिसवर राहत होती. शुक्रवारी दुपारी ती वस्तीगृहाच्या खोलीत पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली.
घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. दुसरीकडे मयत तरुणीच्या कुटुंबीयांनी वसतीगृहचालक तथा राष्ट्रवादीच्या नेत्यावर गंभीर आरोप केले. आठ महिन्यापासून फीस थकल्याने जीवन घोगरे यांच्याकडून आकांक्षाला मानसिक त्रास सुरु होता, त्यामुळे या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे.
दरम्यान, या वसतीगृहात ४० हून अधिक मुली कॉट बेसेसवर राहतात. महिन्याला प्रत्येकी अडीच हजार रुपये वसतीगृह चालकाकडून घेतले जायचे. या वसतीगृहाला परवानगी नसल्याचे बोलले जात आहे. दजीवन घोगरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठाण मांडले होते. त्यानंतर पोलिसांकडून घोगरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
कोण आहेत जीवन घोगरे पाटील?
जीवन घोगरे पाटील हे राष्ट्रवादीचे एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जातात.पक्षफुटीनंतर घोगरे पाटील हे अजित पवार यांच्या पक्षात गेले. ते अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जात. त्यांनी नांदेड महापालिकेचे विरोधी पक्ष नेतेपदही भूषवले आहे.
