लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा येथे महायुतीमधील घटक पक्षांचा संवाद मेळावा झाला. यावेळी खासदार उदयनराजे भोसले बोलत होते. पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रराजे भोसले, ना. महेश शिंदे, माजी आमदार आनंदराव पाटील, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, वसंतराव मानकुमरे, सुनील काटकर, राजू भोसले, काका धुमाळ, अशोक मोने आदी उपस्थित होते.
उदयनराजे म्हणाले, भविष्यात महायुतीचा जिल्हा म्हणून सातारा ओळखला जाईल. महाविकास आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. राज्यातील मतदानाची आकडेवारी पाहिल्यास महायुतीला सर्व ४५+ जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले, आमच्या दोघांमध्ये मनोमीलन नको म्हणणारे काही लोक होते. मात्र, आम्ही आता कुणाचे ऐकणार नाही. मनोमीलन कायमस्वरूपी ठेवायचे आहे. यात सिंहाचा वाटा हा तुम्हा लोकांचा असणार आहे. यासाठी वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवू. अशोक मोने, सुनील काटकर, वसंतराव मानकुमरे यांनी ज्या भावना व्यक्त केल्या. त्याच भावना जनतेच्याही मनात आहेत.
एकीमध्ये जी ताकद असते, ती दुफळीमध्ये नसते. आम्ही एकत्र आलो आहे ते जिल्ह्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी, आम्ही काही ठरवून आलेलो नाही, तुम्ही लोकच ठरवणार आहात. जिल्ह्याचा विकास साधूया, एमआयडीसीत मोठे प्रकल्प आणूया. पाण्याच्या योजनांसाठी निधी आणूया.
यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, काहींच्या म्हणण्यानुसार उदयनराजेंची उमेदवारी मी जाहीर केली आहे. मात्र, मी उदयनराजेंची उमेदवारी जाहीर केली नाही. जर मी त्यांचे तिकीट जाहीर केले तर विधानसभेची माझी उमेदवारी उशिरा जाहीर होईल. पक्षश्रेष्ठींपुढे जायचे नसते. उमेदवारांच्या नावाचे सोपस्कार पक्षश्रेष्ठींनी पार पाडून उमेदवार जाहीर करावा. आता सातारची लोकसभेची लढाई काय होणार आहे, हे लक्षात आले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ताकदीने पुढे जायचे आहे.
मी पक्षनिष्ठा मानून काम करणारा नेता आहे. पक्षाने आदेश दिल्यास मी व माझा कार्यकर्ता कुठे जाणार नाही. मागे संघर्ष झाला असेल, पण कार्यकर्त्यांच्या पाठिशी या पुढेही उभा राहणार आहे. कार्यकर्त्यांच्या मंत्रिपदाच्या भावना चांगल्या आहेत. मात्र, योग्यवेळी त्याची संधी मिळेल, असेही शिवेंद्रराजे यांनी सांगितले.