• Fri. Mar 6th, 2026
    KDMC मध्ये मनसेची शिंदेंशी हातमिळवणी, पण महापालिकेत स्वतंत्र दालनच नाही, पालिका आयुक्तांनी अभिप्राय मागवला

    Maharashtra Politics : मनसेला महापालिकेत स्वतंत्र दालन द्यायचे की नाही, याबाबत पालिका आयुक्तांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे अभिप्राय मागितला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. वृत्तसेवा, ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाबरोबर निवडणूक लढविलेल्या मनसेने निवडणुका संपताच शिवसेना शिंदे गटाबरोबर हातमिळवणी केली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसेच्या ५९ नगरसेवकांचा कल्याण-डोंबिवली शिवशक्ती युती हा गट स्थापन करण्यात आला आहे. यामुळे शिवशक्ती गटाचा भाग असलेल्या मनसेला महापालिकेत स्वतंत्र दालन द्यायचे की नाही, याबाबत पालिका आयुक्तांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे अभिप्राय मागितला आहे.

    या अभिप्रायावर मनसेचे पाच नगरसेवक आपल्या स्वतंत्र दालनात बसणार की शिवसेना गटनेते दालनात जागा शोधावी लागणार, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    KDMC Raj Thackeray Eknath Shinde 3  Maharashtra Times

    ‘शिवशक्ती युती’ हा स्वतंत्र गट

    कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या २०२६च्या निवडणुकीत शिवसेना ५३, भाजप ५०, उबाठा ११, मनसे ५, काँग्रेस २० आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १ असे पक्षीय बलाबल प्राप्त झाले आहे. त्यानंतर शिवसेनेने राजकीय डावपेच रचत महापालिकेतील सर्वात मोठा गट बनण्यासाठी मनसे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाला सोबत घेत ५९ सदस्यांचा ‘कल्याण-डोंबिवली शिवशक्ती युती’ हा स्वतंत्र गट स्थापन केला. या गटाच्या नोंदणीसाठी मनसे आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी पाठिंब्याची पत्रे कोकण विभागीय आयुक्तांकडे सादर केली होती. त्यानंतर या गटाला कायदेशीर मान्यता असल्याचे कोकण विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

    KDMC Raj Thackeray Eknath Shinde 2  Maharashtra Times

    Maharashtra TimesBMC Election : काँग्रेस-सपा नगरसेवकांकडून ठाकरेंचा गेम, प्रभाग समिती अध्यक्ष निवडणुकीत श्रद्धा जाधवांचा एका मताने पराभव

    स्वतंत्र दालन मिळणार का?

    महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी कोकण विभागीय आयुक्तांना महापालिकेतील सदस्यसंख्येबाबत पत्रव्यवहार केला होता. त्या पत्राच्या उत्तरात शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे हे एकाच गटाचे सदस्य असल्याचे नमूद केल्याने मनसेच्या स्वतंत्र अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवसेना सदस्यांकडून मनसे हा स्वतंत्र राजकीय पक्ष असल्याने त्यांना महापालिकेत स्वतंत्र दालन मिळायला हवे, असा दावा केला जात आहे.
    Maharashtra TimesNCP Merger : दोन्ही पक्षांच्या भावना समजून घेणारा नेताच उरला नाही, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णविराम, जयंत पाटलांचं सूतोवाच

    पायलट व्हायचे बाकी राहिलेत म्हणणाऱ्या निलेश राणेंना उत्तर; रोहित पवारांचा सावधतेचा इशारा

    मनसेचा समावेश शिवसेना गटात झाल्यामुळे त्यांना स्वतंत्र दालन देता येईल का, याबाबत पालिका आयुक्तांनी पुन्हा एकदा कोकणविभागीय आयुक्तांकडे मार्गदर्शन मागितले आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा