यंदा तरी राजकीय पक्ष महिलांना उमेदवारी देत नाशिकच्या स्त्रीशक्तीला संसदेत स्थान मिळवून देतील का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. नाशिकच्या पुण्य भूमीतील स्त्री आज वेगवेगळ्या क्षेत्रांत स्वतंत्र ठसा उमटवत आहे. येथील महिलांनी प्राचीन काळापासून राजकीय, तसेच समाजव्यवस्थेवर पकड ठेवल्याचे दिसते. मात्र, स्वातंत्र्योत्तर राजकारणात महिलांना पुरेशी संधी मिळालेली नाही. मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून ४८ जागांपैकी एकूण आठ जागांवर महिलांना खासदार होण्याची संधी मिळाली. त्यात उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून डॉ. भारती पवार, नंदुरबारच्या डॉ. हीना गावित आणि रावेरच्या रक्षा खडसे (सर्व भाजप) यांचा समावेश राहिला. नाशिकच्या महिला आमदारांनी विधानसभेत चांगला ठसा उमटविलेला दिसतो. मात्र, खासदारकीसाठी राजकीय पक्षांनी त्यांचा अजूनही विचार केलेला दिसत नाही.
१७० मध्ये अवघ्या सहाच महिला
१९५१ ते २०१९ पर्यंत नाशिक लोकसभा मतदारसंघातून १७० पैकी अवघ्या सहा महिलांनी खासदारकीसाठी उमेदवारी केली. त्यातील एकाही महिलेला खासदार होण्याची संधी नाशिककरांनी दिली नाही. ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’कडून १९६२ मध्ये मालेगावमधून शांताबाई दाणी यांनी लोकसभा निवडणूक लढविली. त्यानंतर याच पक्षाकडून १९८० मध्ये नाशिकमधून त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली. शांताबाई दाणी नऊ उमेदवारांपैकी एक होत्या. १९८९ मध्ये लीला कांबळे या बहुजन समाज पक्षाकडून १४ उमेदवारांपैकी एक होत्या. २००४ मध्ये नऊ उमेदवारांमध्ये विमलताई आव्हाड, लता बर्डे या दोघी अपक्ष लढल्या. २०१९ मध्ये सोनिया जावळे या भारतीय आदिवासी पक्षाकडून, तर सिंधूबाई केदार यांनी अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढविली होती.
प्रमुख राजकीय पक्षांनी नाकारले
गेल्या १७ लोकसभा निवडणुकींत काँग्रेस, भाजपसह सर्वच प्रमुख पक्षांनी महिलांना उमेदवारी देण्याबाबत नकारघंटा वाजवली आहे. आरपीआय व भारतीय आदिवासी पक्षाने काय तो महिलांवर विश्वास दाखविल्याचे दिसते.
उत्तर महाराष्ट्रातून यंदा महिला चेहरे
अठराव्या लोकसभेसाठी उत्तर महाराष्ट्रातील दिंडोरी मतदारसंघातून भारती पवार यांना भाजपने पुन्हा उमेदवारी देत त्यांच्यावर विश्वास दाखविला आहे. जळगावमधून स्मिता वाघ, रावेरमधून रक्षा खडसे, तर नंदुरबारमधून हीना गावित यांना उमेदवारी दिली आहे. धुळ्यातून माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांचे नाव काँग्रेसकडून चर्चेत असून, त्यांचे नाव निश्चित झाल्यास आणखी एका महिला उमेदवाराला यंदा संधी मिळू शकेल.