सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपकडून आमदार राम सातपुते, तर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यात काँटे की टक्कर सुरू आहे. प्रचारात दोन्ही उमेदवारांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. विरोधकांनी बारीक लक्ष देत आमदार प्रणिती शिंदेंविरोधात आचारसंहिता भंग केल्याची तक्रार दाखल केली आहे. प्रणिती शिंदे यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार आचारसंहिता कक्षाच्या प्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्याकडे दाखल झाली आहे. जिल्हा प्रशासन अधिकारी मनीषा कुंभार यांनी तत्काळ कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत.
वैभव बिराजदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोलापुरात लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू आहे. मात्र, सोलापूर शहरातील रिक्षांवर (क्रमांक एम एच १३ बी व्ही १६२८, एमएच १३ जी ९६८०) परवानगी न घेता डिजिटल बॅनर लावण्यात आले आहेत. त्या त्या बॅनरवरील संपर्क क्रमांक ७०६६६२४२२२ हा डायल केल्यावर कॉलर आयडीवर काँग्रेस उमेदवार, आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव आढळून येत आहे. याशिवाय, सोलापूर सोशल फोरमने शहरातील महापौर बंगला, सात रस्ता चौक, शासकीय विश्रामगृह संरक्षण आवार, रंगभवन चौक, नर्मदा हॉस्पिटल, डफरीन चौक, नवल पेट्रोल पंपानजीक या ठिकाणीही विनापरवाना डिजिटल लावून आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे आमदार प्रणिती शिंदे आणि सोलापूर सोशल फोरम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बिराजदार यांनी तक्रार अर्जात केली आहे.