म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुंबईसह कोकणात तापमानात वाढ नोंदविण्यात आली आहे. रत्नागिरीतील दापोली येथे रविवारी ३८.७, मुंबई उपनगरातील सांताक्रूझ येथे ३६.५, तर पालघर येथे ३४.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली. मुंबई उपनगर व महामुंबईत सहसा आर्द्रतेसह पारा ३५ अंशांदरम्यान असतो. रविवारी मात्र उपनगरात आर्द्रता कमी होऊन शुष्क वाऱ्यांसह पारा अधिक असल्याने उन्हाच्या झळा बसत असल्याचे दिसून आले. हे वातावरण सोमवारीही कायम राहण्याची शक्यता आहे.मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पाऱ्यात वाढ नोंदवली गेलीच होती. रविवारी मात्र दुपारी अडीच ते तीनदरम्यान उन्हाच्या झळा तीव्र होत्या. एरव्ही आर्द्रतामय दिसणारे वातावरण शुष्क अधिक असल्याची स्थिती होती. यादरम्यान मुंबई शहरातील कुलाबा येथे ३३.१ अंश सेल्सिअस तापमानासह कमाल सापेक्ष आर्द्रता १०० टक्के होती. मात्र, मुंबई उपनगरातील स्थिती वेगळी होती. उपनगरातील सांताक्रूझ येथे ३६.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानासह सापेक्ष आर्द्रता ७८ टक्के होती. मात्र, दुपारच्या वेळी पारा कमाल स्तरावर असताना हवेतील आर्द्रता ५० टक्क्यांहून कमी होती. त्यामुळेच झळा अधिक होत्या, असे दिसून आले.
कर्जत येथे ४० अंश सेल्सिअस
रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे रविवारी कमाल तापमानाचा पारा ४०.४ अंश सेल्सिअस नोंदवला गेला. मात्र, हे तापमान शनिवारपेक्षा दोन अंश कमी होते, हे विशेष. त्याचवेळी कमाल सापेक्ष आर्द्रता ५२ टक्केच असल्याने झळा अधिक होत्या.
चार जिल्ह्यांना आज ‘ऑरेंज अलर्ट’
हवामान खात्याने रविवारी विदर्भातील पाच जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला होता. आता सोमवारी अकोला, अमरावती, नागपूर व गोंदिया यांना असा अलर्ट देण्यात आला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात कुठलाही इशारा नाही. मात्र, खान्देशसह मराठवाड्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.