उजनी धरणाची क्षमता ११७ टीएमसी आहे. त्यापैकी मृत पाणीसाठा ६३.६० टीएमसी आहे. या वर्षी पाऊस कमी असल्यामुळे उजनी धरण ६० टक्क्यांपर्यंत भरले होते. सोलापूर शहराला पिण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्यापेक्षाही जास्त पाणी नदीच्या पात्रातून सोडल्याने मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच धरणातील पाणीसाठी उणे गेला होता. या वर्षी प्रथमच उजनी धरणाचे पाणी दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यांपर्यंत एकरूप योजनेच्या माध्यमातून पोहोचवण्यात आले. हिप्परगा व कन्नूर तलावातही पाणी सोडण्यात आले आहे. परिणामी उजनी धरणातील पाणीसाठा कमी झाला. उजनीच्या बॅक वॉटरवरील शेतकऱ्यांना शेतातील पीक जगण्यासाठी कसोशीचे प्रयत्न करावे लागत आहेत. पाणीपातळी कमी झाल्यामुळे शेतीपंपांना वाढीव पाइप लावावे लागत आहेत. शेतात पाणी आणून पीक जगण्यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्न करावे लागत आहेत. उजनी धरणामधून सोलापूर जिल्ह्यासाठी ११ मार्च ते २३ मार्च या कालावधीत उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले होते. यामुळे यंदा एप्रिल, मे महिन्यांमध्ये पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
११७ टीएमसी
उजनी धरणाची क्षमता
६३.६० टीएमसी
मृत पाणीसाठा
४३.५९ टीएमसी
सध्याचा पाणीसाठा