मनसेसोबत चर्चा सुरु आहेत, उद्या गुढीपाडवा मेळाव्यात गोड बातमी मिळणार का? असा प्रश्न पत्रकारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. त्यावर फडणवीस मनापासून हसले. “मनसेशी गेल्या काळात काही चर्चा झाल्यात, हे खरं आहे. विशेषतः मनसेने हिंदुत्वाचा अजेंडा घेतल्यापासून आमची त्यांच्याशी जवळीक वाढली. आमची अपेक्षा आहे की… राज ठाकरे हे पहिले व्यक्ती होते, ज्यांनी २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एंडॉर्समेंट केलं होतं. जाहीरपणे भूमिका घेतली होती की मोदींना पंतप्रधान बनवलं पाहिजे.” असं फडणवीस म्हणाले.
“मधल्या काळात त्यांनी वेगळी भूमिकाही घेतली, मात्र आज त्यांना देखील हे मान्य असेल, की ज्याप्रकारे दहा वर्षांत मोदींनी भारताचा विकास केला, नवभारताची निर्मिती केली, अशा परिस्थितीत सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. विशेषतः जे लोक राष्ट्रीय विचारांनी प्रेरित आहेत, ज्यांच्यासाठी राष्ट्र प्रथम आहे, त्यांनी..” असं फडणवीस म्हणाले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
“राज ठाकरे आणि मनसे महायुतीत सहभागी होती, नरेंद्र मोदींना पाठिंबा देतील, असा मला विश्वास आहे. त्यांच्या पक्षाचा निर्णय बाकी आहे, मात्र मला तशी अपेक्षा आहे” असं फडणवीस म्हणाले. मात्र महायुतीच्या जागावाटपात मनसेला कोणता मतदारसंघ मिळेल, याबाबत “कितीही फिरवून विचारलंत, तरी माझं उत्तर तेच आहे” असं दोनदा सांगत बोलणं टाळलं.