• Mon. Nov 25th, 2024
    उन्हाच्या झळांपासून बचावासाठी सावलीत गेले, तेवढ्यात अनर्थ घडला; आडोसा ठरला चिरविश्रांती!

    म. टा. वृत्तसेवा, नाशिक : तीव्र उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी सावलीच्या आडोशाची विश्रांती ३८ वर्षीय चालकासाठी ‘चिरविश्रांती’ ठरली. ज्या ट्रकखाली चालक विश्रांती घेत होता तोच ट्रक अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची करुण घटना मंगळवारी अंबड औद्योगिक वसाहतीतील एका ट्रान्स्पोर्टजवळ घडली. कृष्णा मुरलीधर जगताप (वय ३८, रा. भोर टाउनशिप, चुंचाळे शिवार, अंबड) असे या चालकाचे नाव आहे. त्यांच्या मागे वडील, पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणी सुनील मुरलीधर जगताप (वय ३८) यांनी अंबड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अंबड एमआयडीसी येथील राज ट्रान्स्पोर्टवर ट्रकच्या आडोशाला कृष्णा जगताप बसले होते. ज्या ट्रकच्या खाली ते बसले होते तो ट्रक चंदनसिंग दशरथसिंग कानडिया (वय ४३, रा. इंदूर, मध्य प्रदेश) या चालकाने कोणतीही शहानिशा न करता पुढे घेऊन निघून गेला. मात्र, ट्रकखाली बसलेले जगताप यांच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा जगताप मूळचे शिंदखेडा (जिल्हा धुळे) येथील असून, गेल्या दहा-बारा वर्षांपासून ते नाशिकमध्ये स्थायिक झाले होते.

    नागपुरात उष्माघाताचा बळी

    उपराजधानीत पार चढत असून, उष्माघाताने एका इसमाचा मृत्यू झाला. बेलतरोडी पेालिस ठाण्याच्या हद्दीतील भंडारा-जबलपूर महामार्गाजवळील झाडाखाली बुधवारी सकाळी ४०वर्षीय युवक मृतावस्थेत आढळला. त्याची ओळख पटलेली नाही. उष्माघाताने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
    भिवंडी शरद पवारांनी खेचली, शिंदे गटातून आलेल्या बाळ्यामामांना तिकीट, काँग्रेसची नाराजी वाढली

    विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू

    अंबरनाथ पश्चिम येथील ‘एमआयडीसी’च्या जांभूळ जलशुद्धी केंद्रामध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्याचे काम करत असलेल्या चार कंत्राटी कामगारांना गुरुवारी दुपारी अचानक विजेचा तीव्र धक्का बसला. या दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाला. एक कामगार जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    टाक्या स्वच्छ करताना त्या ठिकाणी साचलेले पाणी उपसण्यासाठी पाण्याचा पंप चालू करण्यात आला होता. हा पंप अचानक बंद पडल्याने कामगार तो पुन्हा सुरू करण्यासाठी गेले. त्यातील तिघांनी पंप उचलण्याचा प्रयत्न करताच विजेचा तीव्र धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. शालिग्राम मंडल (१८), गुलशन मंडल (१८) आणि राजन मंडल (१९) अशी त्यांची नावे आहेत. यात जखमी झालेल्या एका कामगारावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्वरित दोघा कामगारांनी तिथून पळ काढला. याप्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करून अधिक तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. ‘एमआयडीसी’ आणि ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे तीन कामगारांना हकनाक जीव गमवावा लागल्याने संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed