• Mon. Nov 25th, 2024
    नाशिकसाठी रस्सीखेच सुरुच, महायुतीमधून अजय बोरस्ते, राहुल ढिकले यांची नावं पुढे

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महायुतीकडून नाशिकच्या जागेवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे उमेदवारीवर ठाम आहेत. मात्र, त्यांच्या नावाला भाजपसह एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून छुपा विरोध होत असल्यामुळे उमेदवाराची घोषणा लांबणीवर पडली आहे. त्यामुळे नाशिकसाठी महायुतीतील दोन समन्वयकांचीच नावे आता पुढे आली आहेत. शिवसेना शिंदे गटाने आता जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचे नाव पुढे केल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या भांडणात भाजपकडे जागा गेल्यास, आमदार अॅड. राहुल ढिकले यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याचा दावा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून केला जात आहे.महायुतीत नाशिकच्या जागेचा घोळ २१ दिवसांनंतरही सुटू शकलेला नाही. शिंदे गटाच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी घोषणा करूनही हेमंत गोडसे यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. भाजपने विरोध केल्यामुळे गोडसे यांचा पत्ता कट होऊन, अचानक अजित पवार यांचाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे नाव नाशिकसाठी पुढे केले आहे. भुजबळांनीही महायुतीचा आदेश असेल तर लढणारच, असा पवित्रा घेतला. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेनेची कोंडी झाली आहे. मराठा आरक्षणाला विरोधामुळे भुजबळांना विरोध होत असताना, भाजपनेही त्यांच्या विरोधात अभिप्राय दिल्याची चर्चा आहे. शिवसेनेनेही भुजबळांना विरोध करत जागेवरील दावा कायम ठेवला आहे.
    प्रवाशांसाठी मोठी बातमी: उन्हाळी सुट्टीसाठी STच्या विशेष १०८८ बसगाड्या, कोणत्या जिल्ह्यातून किती बस धावणार?

    असे असताना शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपचा विरोध कमी करण्यासाठी हिंगोली आणि यवतमाळच्या धर्तीवर नाशिकमध्येही नवीन उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे. महायुतीतील लोकसभा समन्वयक व जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचेच नाव आता पुढे आले आहे. भाजपनेही शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुरू असलेल्या वादामुळे ही जागा भाजपलाच मिळावी, असा आग्रह धरत सर्वेक्षणात आघाडीवर असलेले नाशिक पूर्वचे आमदार अॅड. राहुल ढिकले यांचे नाव पुढे केले आहे. त्यामुळे नाशिकच्या उमेदवारीबाबतचा संभ्रम अधिक वाढला आहे.

    समन्वयकच उमेदवार?महायुतीकडून नाशिक लोकसभा मतदारसंघातील तिन्ही पक्षांकडून तीन लोकसभा समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यात भाजपकडून अॅड. राहुल ढिकले, शिवसेनेकडून अजय बोरस्ते, राष्ट्रवादीकडून निफाडचे आमदार दिलीप बनकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. लोकसभेचा उमेदवार निश्चित करण्यासह निवडणुकांचा भार उचलण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. मात्र, आता उमेदवारीचा गोंधळ सुरू असल्यामुळे ढिकले आणि बोरस्ते या दोन समन्वयकांपैकी एकाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed