• Mon. Nov 25th, 2024
    कल्याणमधील मुलांच्या अभ्यासिकेची दुपटीहून अधिक फी, फीवाढीविरोधात विद्यार्थ्यांनी उठवला आवाज

    म. टा. वृत्तसेवा, कल्याण : ‘भाकरी खायला परवडत नाही, मग केक खा!’ असा अनुभव सध्या कल्याणमधील गरीब घरातील मुलांना येत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने एक अभ्यासिका चालवली जाते. ‘पार्ट टाइम’ नोकरी करून शिकणारी ही मुले येथे अभ्यास करतात. त्यामुळे अभ्यासिकेची मासिक २०० रुपये फी देखील त्यांना परवणारी नाही. अशातच आता १०० रुपये नोंदणीशुल्कासह दरमहा ५०० रुपये फी भरण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे या विद्यार्थ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे.कल्याण-डोंबिवली महापालिकेने कल्याण पश्चिमेकडील सहजानंद चौकात खासदार प्रकाश परांजपे यांच्या खासदार निधीतून यशवंतराव चव्हाण मुक्तविद्यापीठाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले होते; मात्र हे केंद्र बंदच असून, या केंद्रातील एका मजल्यावर महापालिकेने २०२१मध्ये अभ्यासिका सुरू केली. महापालिका क्षेत्रातील पालिकेची ही एकमेव अभ्यासिका आहे.
    भारतीय हवाई क्षेत्राचे नियंत्रण नागपुरातून? संयुक्त केंद्राची स्थापना ‘एएआय’च्या विचाराधीन
    यात विद्यार्थ्यांना मासिक २०० रुपये फीमध्ये अभ्यास करता येतो. गरीब घरातील अनेक विद्यार्थी ‘पार्ट टाइम’ नोकरी करून आई-वडिलांना घर चालवण्यास मदत करत, या ठिकाणी अभ्यासाला येतात. खरे तर, या विद्यार्थ्यांना २०० रुपये भरणेही कठीण असते. पण, शिक्षणासाठी ही मुले पदरमोड करतात.

    येथे स्वच्छतागृहाची दुरवस्था असल्याने मुला-मुलींना एकाच स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतो. स्वच्छतागृहाची नियमित स्वच्छता केली जात नाही, त्यामुळे दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. पिण्यासाठी पाणी नाही, त्यात तुटलेली बाके-खुर्च्या अशा समस्या असतानाही शहराच्या कानाकोपऱ्यातून येणारी ही मुले त्याविरुद्ध ब्र देखील न काढता अभ्यास करतात.

    मात्र, पालिकेने ही अभ्यासिका अचानक ‘गणेश एंटरप्राइजेस’ या कंत्राटदाराला चालवण्यास दिली. त्यानंतर त्याने या अभ्यासिकेची फी दुपटीहून अधिक वाढवली आहे. ‘गुरुवारपासून विद्यार्थ्यांना अभ्यासिकेसाठी १०० रुपये नोंदणी फी आणि दरमहा ५०० रुपये फी द्यावी लागणार आहे’, अशा आशयाची नोटीस बोर्डावर लिहिल्याने विद्यार्थ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

    दरम्यान, यासंदर्भात मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांच्याशी संपर्क साधला असता, याप्रकरणी तक्रार प्राप्त झाली असून, वरिष्ठ याबाबत निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तर कंत्राटदार गणेश पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, या अभ्यासिकेत अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना सोयीसुविधा देण्यासाठी आवश्यक असलेलीच फी वाढवण्यात आली आहे. शुल्कवाढ मान्य नसेल, तर आपण काम थांबवण्यास तयार आहोत.

    ‘खासगीकरण, फीवाढ रद्द करा’

    या विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेचे खासगीकरण आणि फीवाढीविरोधात आवाज उठवला आहे. अभ्यासिकेचे खासगीकरण करू नये आणि फीवाढ मागे घ्यावी , अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर यांनी विद्यार्थ्यांच्या वतीने मालमत्ता विभागाच्या उपायुक्त वंदना गुळवे यांना भेटून हे खासगीकरण तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे महापालिका विद्यार्थ्यांना सेवा देण्यास सक्षम नसेल, तर मनसे अभ्यासिका चालवण्यास तयार आहे; मात्र हे खासगीकरण रद्द करा, अशी आग्रही मागणी केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed