भाजपने विद्यमान खासदार असतानाही तिकीट कापत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यामुळे उन्मेष पाटील नाराज होते. अखेर महायुतीचा हात सोडत त्यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केला. अशाप्रकारचे महाराष्ट्रातील पहिलेच पक्षांतर असल्यामुळे हा भाजपसाठी मोठा हादरा मानला जातो. वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती आहे. तुमच्या आणि माझ्या भावना सारख्या आहेत, अशी प्रतिक्रिया पाटलांच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
“तुमच्या आणि माझ्या भावना सारख्या आहेत. तुम्ही आपली व्यथा मांडताना मला माझ्याच व्यथांची आठवण झाली. तुम्ही भाजप वाढवण्यासाठी अतोनात मेहनत घेतलीत, तशीच मेहनत आमच्या शिवसैनिकांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात केली. पण वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती आहे. प्रवाहाविरुद्ध पाण्यात उडी मारण्याचं धाडस तुम्ही केलंत. पण हा प्रवाह जनमताचा आहे, प्रवाह फिरला की मोठमोठे वाहून जातात.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
“आज माझ्याकडे देण्यासाठी काही नाही. तिकडे गेले त्यांची ओळख खोकेवाले, ५० खोके एकदम ओके अशी आहे. जळगावात गद्दारी झाली. पण तुम्ही काम करण्याच्या निष्ठेने इथे आलात. नेहमी सत्तेकडे लोक जातात, पण तुम्ही जनतेची सत्ता आणण्यासाठी शिवसेनेसोबत आलात. तुमचं आमचं ध्येय एक आहे, आपला भगवा एक आहे. मध्यंतरी आपली फसगत झाली, पण फसवूक केली, त्यांना निवडून द्यायचं नाही. आता शिवछत्रपतींचा अस्सल भगवा जळगावातून संसदेवर जाणार. आपण एकत्र वाटचाल करु, विकासाच्या मध्ये येतील त्यांची वाट लावू” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.