• Sat. Sep 21st, 2024

२४ वर्षांनंतर काँग्रेस विरुद्ध भाजप; भंडारा-गोदिंया मतदारसंघातून दोन्ही राष्ट्रवादी गायब

२४ वर्षांनंतर काँग्रेस विरुद्ध भाजप; भंडारा-गोदिंया मतदारसंघातून दोन्ही राष्ट्रवादी गायब

खेमेंद्र कटरे, गोंदिया : भंडारा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी झाल्यानंतर हा मतदारसंघ त्यांच्या वाट्याला गेला. सातत्याने राष्ट्रवादीने या मतदारसंघातून निवडणूक लढविली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडल्यानंतर काँग्रेसने परत हा मतदारसंघ मिळविला आहे. तब्बल २४ वर्षांनंतर परत काँग्रेस विरुद्ध भाजप असा निवडणुकीतील सामना नव्याने रंगणार आहे.

काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडल्यानंतर १९९९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उदय झाला. २००४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडी होऊन भंडारा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला. २०१९च्या निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी या मतदारसंघातून निवडणूक लढवित राहिल्याने या मतदारसंघातून काँग्रेसचा ‘पंजा’ गायब होता. खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या राजकीय ताकदीमुळे काँग्रेसला हा मतदारसंघ परत मिळविता आला नाही. मागील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार बाहेर पडले. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले. शरद पवार गट महाविकास आघाडीत समाविष्ट आहे. तर अजित पवार गट महायुतीत सहभागी आहे. शरद पवार गटाची फारशी ताकद नसल्याने त्यांनी मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्न केले नाही. उमेदवारी दाखल करण्याच्या काही दिवसांपूर्वी माजी खासदार मधुकर कुकडे यांच्या पक्षप्रवेशाने राष्ट्रवादी या मतदारसंघात कामय राहणार असल्याची शक्यता निर्माण झाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा मतदारसंघ काँग्रेसकडे परत मिळविण्यात यश मिळविले. डॉ. प्रशांत पडोळे यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने परत सुनील मेंढे यांच्यावर विश्वास दाखविला आहे.

१९९९ ते २०१९दरम्यान काय घडले?

– १९९९च्या लोकसभा निवडणुकीत पंजा चिन्हावर लढणारे डॉ. श्रीकांत जिचकार हे काँग्रेसचे या मतदारसंघातील शेवटचे उमेदवार होते. जिचकार यांना भाजपच्या चुन्नीलाल ठाकूर यांनी पराभव केला होता. याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदिश निंबार्ते यांनी सुमारे ३३ हजार मते घेतल्याने काँग्रेसचा पराभव झाला होता.
– २००४च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांना भाजपच्या शिशुपाल पटले यांच्याकडून तीन हजार मतांनी पराभव पत्करावा लागला होता.
– २००९च्या निवडणुकीत भाजपचे शिशुपाल पटले यांचा पराभव प्रफुल्ल पटेल यांनी पराभव करीत राष्ट्रवादी काँग्रेसला पहिल्यांदा या मतदारसंघातून विजय मिळवून दिला होता. अपक्ष उमेदवार नाना पटोले यांनी भाजप उमेदवारापेक्षाही अधिक मते घेतली होती. भाजप उमेदवाराला डिपॉझिटही वाचविता आले नव्हते.
– २०१४मध्ये भाजपच्या तिकिटावर पटोलेंनी निवडणूक लढवित प्रफुल पटेलांचा पराभव केला.
२०१८च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मधुकर कुकडे यांच्या रुपाने मतदारसंघ परत मिळविला.
– २०१९मध्ये भाजपचे सुनील मेंढे यांनी राष्ट्रवादीच्या नाना पंचबुद्धे यांचा पराभव केला होता.
या वयात साहेब लढतायेत, तुम्हीही लढले पाहिजे, पदाधिकाऱ्यांचा आग्रह, माघार घेतलेले श्रीनिवास पाटील पुन्हा लढणार?
लक्षवेधक…

– १९९९नंतर राष्ट्रवादीला दोनदाच या मतदारसंघात विजय मिळविता आला.
– भारतीय जनता पक्षाने चार वेळा विजय मिळविला आहे.
– २०१४मधील पराभवानंतर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक लढविली नाही.

बड्या नेत्यांच्या सभांसाठी जोर

भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी १९ एप्रिल रोजी निवडणूक होत आहे. भाजपविरुद्ध काँग्रेस अशी थेट निवडणूक होणार असल्याने दोन्ही पक्षांचे उमेदवार प्रचारासाठी जोर लावत आहेत. पक्षाच्या बड्या नेत्यांच्या सभांसाठीही उमेदवारांकडून प्रयत्न होत असल्याची माहिती आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गोंदियाला सभा झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल हे स्टार प्रचारक होते. आता बदललेल्या राजकीय समीकरणामुळे भाजप उमेदवाराच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादी काँग्रेस काम करीत आहे. भाजप उमेदवार सुनील मेंढे यांचे संपूर्ण मतदारसंघातील गावांमध्ये भेटी सुरू झाल्या आहेत. सकाळपासून सुरू झालेला संपर्क कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू असतो. त्याचबरोबर काँग्रेस उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनीही प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याही सभा होत आहेत. ही जागा काँग्रेसने प्रतिष्ठेची केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्यापैकी एकाची सभा व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा गोंदिया येथे होण्याची शक्यता आहे. या सभा मतदानाच्या काही दिवसांअगोदर होण्याचे बोलले जात आहे.

गृहमंत्री अमित शहा यांची शनिवारी गोंदियात सभा

गोंदिया : भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दि. ६ एप्रिल रोजी गोंदिया जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यादरम्यान ते भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ दुपारी साडेतीन वाजता शहरातील बालाघाट टी-पाईंट मोदी ग्राऊंडवर आयोजित भव्य जाहीर सभेला मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह खासदार, आमदार व महायुतीतील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed