फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाच्या झळा तीव्र होत असताना पाण्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मागील दोन महिन्यांत टँकरच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी राज्यात अवघ्या ५९ गावे व १८० वाड्या-वस्त्यांवर ६८ टँकर सुरू होते. मात्र, चालू वर्षात टँकरच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येते.
२० धरणे कोरडी
येत्या काळात उन्हाचा पारा वाढल्यानंतर पाण्याच्या भीषण टंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे टँकरच्या संख्येत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील १८ ते २० धरणे कोरडी पडली आहेत. याशिवाय अनेक धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. अनेक ठिकाणी विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. बोअरवेलची पाणीपातळी खोल जाऊ लागली आहे. शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी वाढत असताना पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थिती गंभीर
छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक ५७५ गावे, १८४ वाड्यांमध्ये ७७६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नाशिक विभागात सर्वाधिक पाणीटंचाई आहे. ३४५ गावे आणि ९६४ वाड्यांमध्ये ३६३ टँकरने, पुणे विभागात २७० गावे आणि १ हजार ५५६ वाड्यांमध्ये ३३० टँकरने, अमरावती विभागातील २७ गावांत २७ टँकरने तर ठाणे आणि कोकण विभागात १६ गावे व ७० वाड्यांत २६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पाणीसाठ्याची विभागनिहाय स्थिती
कोकण : ५१%
अमरावती : ५०%
नागपूर : ४९%
मराठवाडा : १९%
पुणे : ३७%
नाशिक : ३१%