• Sat. Sep 21st, 2024

नागपुरात चेनस्नॅचिंग करणारे चोरटे निघाले ओडिशाचे, लाखोंचा ऐवज जप्त, दोघांना अटक

नागपुरात चेनस्नॅचिंग करणारे चोरटे निघाले ओडिशाचे, लाखोंचा ऐवज जप्त, दोघांना अटक

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ओडिशातून नागपुरात येऊन चेनस्नॅचिंग करणाऱ्या दोघांना गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने अटक केली. जाफर अली भोलू अली आणि जहीर हुसैन उर्फ मोहम्मद बिहारी (रा. खरीया रोडी, ओडिशा), अशी या आरोपींची नावे आहेत.

काय आहे प्रकरण?

बेलतरोडी पोलिस ठाण्यात २८ मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडलेल्या घटनेत त्यांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी आशा थूल (वय ६५, साकेतनगरी) यांचे डेली नीड्सचे दुकान आहे. त्या दुकानात असताना मोटारसायकलवर आलेल्या दोन तरुणांनी त्यांना शीतपेयाची बाटली मागितली. मात्र, बाटली थंड नसल्याचे सांगत त्यांना काऊंटरवर बोलविले. त्यानंतर आशा यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची सोनसाखळी हिसकावत पळ काढला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्याच दिवशी बेलतरोडी, सक्करदरा, हुडकेश्वर, तहसील व सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत चेनस्नॅचिंगच्या सहा घटना झाल्याची बाब समोर आली.

गुन्हे शाखेने सर्व गुन्ह्यांची माहिती एकत्रित केली. तांत्रिक तपास व खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून पोलिसांनी तपास केला. यात ओडिसातील या दोन आरोपींचा सहभाग असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांना ओडिशाहून अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ४ लाख ८ हजार रुपये किमतीचे दागिने व नंबरप्लेट नसलेली मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक रमेश ताले, वैभव बारंगे, नाजीर शेख, नीलेश ढोणे, सतिश ठाकरे, युवानंद कडू, आशीष क्षीरसागर, पुरुषोत्तम जगनाडे, चेतन गेडाम, अजय पौनीकर, अनंता क्षीरसागर, महेश काटवले, सत्येंद्र यादव, लीलाधर भेंडारकर यांच्या पथकाने केली.

दोघेही सराईत गुन्हेगार

जहीर हुसैन उर्फ मोहम्मद बिहारी हा अट्टल चेनस्नॅचर असून ओडिसा राज्यात विविध पोलिस ठाण्यांत त्याच्याविरोधात २१ गुन्हे दाखल आहेत. हे दोघे हैदर अली अकरम अली (रा. न्यू आपाडा, ओडिशा) याच्यासोबत नागपुरात यायचे. रेकी करायचे व त्यानंतर गुन्हे करून परत जायचे. हैदर अली हा वाहन चालवायचा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed