• Sat. Sep 21st, 2024
मुलावर वडिलांकडून परस्पर अंत्यसंस्कार; गळ्यावर खुणा, शिरांचा रंगही बदललेला, आईला एक संशय अन्…

अक्षय शिंदे, जालना: जालन्यातील माळेगाव येथे एका ११ वर्षीय मुलाचा अपघात झाल्याचे सांगून पोलिसांना माहिती न देता परस्पर अंत्यसंस्कार केल्याचे प्रकार उघड झाला आहे. यानंतर आईने तक्रार केल्यामुळे पोलिसांनी सोमवारी पुन्हा मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणी केली आहे. अद्याप उत्तरीय तपासणीचा अहवालाची प्रतीक्षा आहे. आर्यन रावसाहेब भाटसोडे असे मृत मुलाचे नाव आहे. तालुका पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

कौटुंबिक वादामुळे पती-पत्नी वेगवेगळे राहत होते. यात आईकडे एक मुलगा राहत होता, तर वडिलांकडे ११ वर्षीय दुसरा मुलगा राहत होता. वडिलांकडील मुलाचा अपघाती मृत्यू झाला, असे सांगून आईला बोलावून अंत्यविधी केला. परंतु, मृत मुलाच्या गळ्यावर खुणा असल्याने घातपात असल्याची तक्रार आईने पोलिसांकडे केली. यानंतर पोलिसांनी गावात जाऊन मृतदेह उकरून शरीराचे नमुने घेतले. साडेचार तास ही प्रक्रिया चालली. पोस्टमॉर्टम अहवाल फॉरेन्सिक लॅबला पाठवला असून आता २४ तासांनंतर मृत्यूचे कारण समोर येणार आहे.

माळेगाव येथील रावसाहेब भाटसोडे आणि त्यांची पत्नी सिंधुबाई यांच्यामध्ये काही वर्षांपासून वितुष्ट निर्माण झालेले असल्याने ते दोघे वेगवेगळे राहत आहेत. सिंधुबाई भाटसोडे (३०) या त्यांच्या नातेवाइकांकडे चिखली तालुक्यातील अंत्री येथे एका मुलासह राहत आहे.

या विषयी माहिती देताना तालुका ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी सांगितले, जालना तालुक्यातील माळेगाव येथील रावसाहेब भाटसोडे व त्यांची पत्नी सिंधुबाई भाटसोडे या काही वर्षांपासून पतीपासून वेगळ्या राहतात. सिंधूबाई भाटसोडे या चिखली तालुक्यातील अंत्री येथे मुलगा आर्यन भाटसोडे यांच्यासोबत राहतात. रावसाहेब भाटसोडे हे माळेगाव येथे राहतात.

दोन दिवसांपूर्वी रावसाहेब भाटसोडे हे मुलगा आर्यन याला माळेगाव येथे घेऊन आले होते. दरम्यान, ३० मार्च रोजी दुपारी सिंधूबाई भाटसोडे यांना त्यांच्या मेहुण्याने आर्यन याचा अपघात झाल्याचे फोनवर सांगितले. सिंधूबाई माळेगाव येथे आल्यानंतर त्यांना आर्यन याचा मृतदेह एका बाजेवर झोपलेल्या स्थितीत दिसला. त्याच्या गळ्याभोवती खुणा आणि शिरा निळ्या पडलेल्या आईला व नातेवाइकांना आढळून आल्या होत्या. दरम्यान, त्याच दिवशी पोलिसांना माहिती न देता रात्री गावातील स्मशानभूमीत आर्यनवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुणे लोकसभेतील सहाही आमदार महायुतीचे, अजित दादांना पडला काँग्रेस आमदार धंगेकरांचा विसर

सोमवारी सकाळी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक सुरेश उनवणे, नायब तहसीलदार सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी तन्वीर शेख, सहायक निरीक्षक ए. वाय. पाटील हे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आर्यनचा पुरलेला मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला. त्यानंतर नातेवाइकांच्या परवानगीने आर्यनच्या मृतदेहावर पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी तालुका ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed