• Mon. Nov 25th, 2024
    करलगाव पूल वाहतुकीसाठी धोक्याचा, दुरुस्तीसाठी दोन महिने अवजड वाहतूक बंद

    म. टा. वृत्तसेवा, वाडा : वाडा-मनोर महामार्गावर असलेल्या देहर्जे नदीवरील करलगाव पुलाचा काही भाग रविवारी अचानक खचला. त्यामुळे रात्रीपासूनच या मार्गवरील अवजड वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली असून, किमान दोन महिने दुरुस्ती होईपर्यंत ही वाहतूक पाचमाडमार्गे विक्रमगड व पुढे पाली अशी वळवण्यात आली आहे.मनोर-वाडा-भिवंडी या महामार्गाची मागील अनेक वर्षांपासून दयनीय अवस्था आहे. महामार्गावरील तानसा, वैतरणा, पिंजाळ व देहर्जे या नद्यांवरील पुलांवर रस्त्याची अवस्था भीषण आहे. रस्ता खराब झाला की, थरांवर थर दिल्याने पुलांची उंची कमी होऊन त्यावर जादा भार झाल्याने देहर्जे नदीवरील पूल रविवारी वरील भागाला तडा गेल्याने दबला आहे. रात्रीपासून अवजड वाहतूक बंद केल्याने वाहनचालकांना मस्ताननाकामार्गे पाचमाड व पुढे विक्रमगडमार्गे पाली असा प्रवास करावा लागत आहे.
    रत्नागिरी देतो, पण ठाणे किंवा कल्याण हवं; भाजपची शिंदेंना अट? होमग्राऊण्ड देणार की लेकाची सीट?

    सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी चीफ इंजिनीअर डिझायनर विकास रामगुडे यांच्यासोबत जवळ्पास ७५ वर्षे जुन्या या पुलाची सोमवारी पाहणी केली. यानंतर पुलाची अवस्था अतिशय धोकादायक नाही, असे सांगण्यात आले. मात्र, दुरुस्तीसाठी हा पुल किमान दोन महिने अवजड वाहनांसाठी बंद ठेवावा लागेल, अशी माहिती त्यांनी दिली.

    दुर्लक्षाचा परिणाम

    देहर्जे नदीवरील पुलाला झालेले नुकसान या पुलाकडे पूर्णपणे केलेल्या दुर्लक्षाचा परिणाम आहे, हे आता जवळपास सिद्ध झाले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने यातून धडा घेत या महामार्गावरील अन्य पूल व खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जाते.

    सूचनांना केराची टोपली

    महामार्गावरील या ७५ वर्षे जुन्या पुलावर वर्षभर मोठमोठे खड्डे पडत असून, अवजड वाहनांच्या धक्क्याने पूल दिवसेंदिवस नाजूक होतो, याकडे लक्ष द्यायला बांधकाम विभागाला वेळ नव्हता. आताही पुलावरील अवस्था दयनीय असून, वेळोवेळी कोट्यवधी रुपयांची बिले गिळंकृत करणारे कंत्राटदार व अधिकारी यांच्या बेजबाबदारपणामुळे हा पूल आज नादुरुस्त झाला आहे, असा नागरिकांचा आरोप आहे.

    पुलावर वारंवार रस्त्याचे काम केल्याने वजन वाढून बाजूच्या भिंती निखळल्या आहेत. पावसाळ्याच्या आधी काम पूर्ण करून सर्वप्रकारची वाहतूक सूरू करण्याच्या बाबतीत आपण नियोजन करीत आहोत.

    – सिद्धार्थ तांबे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed