• Sat. Sep 21st, 2024

पार्किंग लिफ्टमधील मर्सिडीज गाडीत अडकलेल्या बाप-लेकीची सुखरूप सुटका ; ठाण्यातील घटना

पार्किंग लिफ्टमधील मर्सिडीज गाडीत अडकलेल्या बाप-लेकीची सुखरूप सुटका ; ठाण्यातील घटना

ठाणे: इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील पार्किंग लिफ्टमधील मर्सिडीज गाडीत जवळपास २५ मिनिटे बाप-लेक अडकून होते. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांमुळे त्या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. दर्शन कोळी (47) आणि दर्शिता कोळी (१९) अशी त्या व्यक्तींची नावे आहेत. ही घटना पाचपाखडी येथील ज्वेर्स सोसायटीत रविवारी रात्री साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान घडली.

ज्वेर्स सोसायटी ही २२ मजली असून १ ते ५ मजल्यावर वाहन पार्किंगची व्यवस्था आहे. दर्शन कोळी यांनी आपली मर्सिडीज गाडी पार्क करण्यासाठी पार्किंग लिफ्टमध्ये नेली तेव्हा त्या गाडीत त्यांची मुलगी ही त्यांच्यासोबत होती. तेव्हा लिफ्ट अचानक तिसऱ्या मजल्यावर जाऊन अडकली. त्यामुळे लिफ्टमध्ये गाडीसह ते दोघेही अडकले. लिफ्ट सुरु होत नसल्याचे लक्षात येताच कोळी यांनी सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला त्याबाबत माहिती दिली. सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला या घटनेची माहिती मिळताच सोसायटीतील लोकांनी अग्निशमन दलाला बोलावले. अग्निशमन दलाने घटनास्थळी तातडीने धाव घेतली.

बाप-लेक जवळपास २५ मिनिटे लिफ्टमध्ये अडकून होते. अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नांमुळे शेवटी त्या दोघांना लिफ्टमधून सुखरुप बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्ठापन कक्षाचे अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed