• Fri. Mar 6th, 2026
    Supriya Sule : ’20 वर्षांनी तसंच घडतंय, मी पहिल्यांदा राज्यसभेत गेले तेव्हा बाळासाहेब हयात होते’, सुप्रिया सुळेंकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा

    ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा आज राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात आला. अर्ज दाखल केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देत भावनिक प्रतिक्रिया दिली. आपण जेव्हा पहिल्यांदा राज्यसभेत गेलो तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी खुल्या मनाने पाठिंबा दिला होता. त्यामुळे ती निवडणूक बिनविरोध झाली होती, अशी आठवण सुप्रिया सुळे यांनी सांगितली. त्याचबरोबर आता शरद पवारांच्या 6 दशकांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीनंतर त्यांना पुन्हा राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून पाठिंबा मिळाला. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. 20 वर्षांनी असा योगायोग आल्याचं त्या म्हणाल्या. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाचेदेखील आभार मानले. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्याला फोन केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

    “मी उद्धव ठाकरे यांना भेटायला गेले होते. त्यानंतर मी आज संध्याकाळी साडेसहा वाजता पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी भेटायला जाणार आहे. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संपूर्ण कुटुंबाला भेटायला जाणार आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्ष, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, के. सी. वेणूगोपाल, मल्लिकार्जुन खर्गे, रमेश चेन्नीथला या सर्व नेत्यांचे मन:पूर्वक आभार मानते”, अशा भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या.

    “मला मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, तुझ्या वडिलांनंतर केवळ दोन-तीन वर्षच मी राजकारणात उशिरा आलो. पण गेल्या सहा दशकांपासून आम्ही राजकारणात एकत्र आहोत. मला दिग्विजय सिंह यांचादेखील फोन आला. कमलनाथ यांचा फोन आला. ही सर्व 6 दशकांची प्रेमाची नाती आहेत. शरद पवार पुन्हा राज्यसभेत जात असल्याने या सर्वांना आनंद झाला. मी उद्धव ठाकरे यांचे आणि प्रत्येक शिवसैनिकाचे अंतःकरणातून आभार मानते”, अशादेखील भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या.

    सुप्रिया सुळे यांच्याकडून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा

    “योगायोग बघा, मी 2006 मध्ये राज्यसभेत पहिल्यांदा गेले, त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात होते. माझी निवडणूकदेखील बिनविरोध झाली होती. त्यानंतर 20 वर्षांनी बाळासाहेब आपल्यात नाहीत, पण काँग्रेस पक्ष आणि शिवसेना, आता जे चित्र दिसतंय, महाराष्ट्राच्या सर्वच पक्षांनी सामंजसपणा दाखवलेला दिसतोय, निवडणूक बिनविरोध होईल, असं चित्र आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे सगळेच पक्ष सामंजसपणे आणि सुसंस्कृत महाराष्ट्राचे दर्शन होताना दिसत आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

    “माजी दिवंगत मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जो महाराष्ट्र होता, त्यामध्ये विरोधक हा आपला शत्रू नव्हता, ही आपली वैचारिक लढाई आहे, असा विचार होता. हीच संस्कृती आज आपल्याला या निवडणुकीत दिसत आहे. आपल्या सगळ्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. हीच तर महाराष्ट्राची खरंच आण, बाण आणि शान आहे. महाराष्ट्राची संस्कृती जपवण्यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत. ही आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

    ‘बारामतीकरांचे नतमस्तक होऊन आभार मानते’

    “मी पुन्हा एकदा शिवसेना, काँग्रेस, महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचे आभार मानते. काल अखिलेश यादव यांच्यासोबत बोलणं झालं. त्यांच्याही सहकार्याची भावना होती. गेल्या सहा दशकात या सगळ्या लोकांनी शरद पवार यांना साथ दिली. ते सर्व नेते आमच्याबरोबर या प्रक्रियेत सोबत होते. त्यामुळे सर्वांचे मी आभार मानते. मी बारामतीकरांचे नतमस्तक होऊन आभार मानते. कारण ही सगळी सुरुवात सहा दशकांपूर्वी फेब्रुवारीत 1967 मध्ये झाली. मी विनम्रतेने सर्वांचे आभार मानते”, अशा भावना व्यक्त करत सुप्रिया सुळे यांनी सर्वांचे आभार मानले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा