• Sat. Mar 7th, 2026
    Nagpur Crime: कॉलेजमधले प्रेमसंबंध, सोनालीच्या लग्नानंतरही भेटायचा; नवऱ्यानं ट्रॅप लावला, होळीला गावी आलेल्या सागरची पती-पत्नीनं मिळून हत्या केली

    जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात गुरुवारी सकाळी दिवसाढवळ्या घडलेल्या एका खळबळजनक हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खापरखेडा-कोराडी रोडवर पती-पत्नीने मिळून एका तरुणावर धारदार चाकूने अनेक वार करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख सागर वानखेडे (रा. सावंगी, ता. नरखेड, जि. नागपूर) अशी झाली आहे. सागर हा पुण्यात नोकरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी राजू गजभिये आणि त्याची पत्नी सोनाली गजभिये (रा. वार्ड क्रमांक २, खापरखेडा) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोनाली गजभिये आणि सागर वानखेडे यांच्यात शिक्षण घेत असताना प्रेमसंबंध होते. मात्र पुढे सोनालीचे लग्न राजू गजभिये याच्यासोबत झाले. लग्नानंतरही सोनाली आणि सागर यांच्यात संपर्क कायम असल्याचे समजते. या कारणावरून राजू गजभियेने यापूर्वी खापरखेडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.

    दरम्यान, होळीच्या सणानिमित्त सागर पुण्यावरून आपल्या सावंगी गावात आला होता. त्यावेळी त्याने इंस्टाग्रामच्या माध्यमातून सोनालीला मेसेज पाठवून भेटण्यासाठी बोलावले. गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास सागर खापरखेडा येथे पोहोचला. श्याम मंगल कार्यालयाजवळ सोनाली त्याच्या दुचाकीवर बसली आणि दोघेही तेथून निघाले.

    MSRTC ST Bus : एसटीचा प्रवास आता अधिक सुरक्षित, मद्यपी चालक-वाहकांवर टाच; नवी नियमावली पाहून अख्खं एसटी महामंडळ कामाला लागलं

    यावेळी सोनाली आपल्या सोबत एक चाकू घेऊन गेल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे राजू गजभियेने मुलांना शाळेत सोडल्यानंतर दोघांचा पाठलाग सुरू केला.
    खापरखेडा-कोराडी मार्गावर कोलार नदीचा पूल ओलांडल्यानंतर सोनालीने मुद्दाम आपली पर्स खाली पाडली. सागरने दुचाकी थांबवून पर्स उचलण्यासाठी खाली वाकताच सोनालीने चाकू काढून त्याच्यावर दोन वार केले. त्याच वेळी घटनास्थळी पोहोचलेल्या राजू गजभियेनेही सागरवर चाकूने अनेक वार केले. या हल्ल्यात सागर गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर दोन्ही आरोपी आपल्या घरी परतले.

    त्यानंतर ते पोलिस ठाण्यात जात असताना पोलिसांच्या डीबी पथकाने त्यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनीही हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

    Maharashtra TimesJyoti Waghmare : शिंदेंच्या शिवसेनेचं धक्कातंत्र, ज्योती वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी; कीर्तिकर-शेवाळेंना मागे टाकत तिकीट

    दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या सागर वानखेडेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी कोराडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोराडी पोलीस करत आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed