Kolhapur News: गोळीबाराचा मोठा आवाज झाल्याने परिसरात गोंधळ उडाला. कॉन्स्टेबल पाटील यांनी प्रसंगावधान राखत जखमी ओंकारला दुकानात नेले आणि शटर खाली ओढले.
जयसिंगपूर पोलिस ठाण्यात ऑक्टोबर 2025 मध्ये एका प्रेम प्रकरणातून अपहरण आणि हल्ल्याच्या गुन्ह्यात ओंकार कांबळे आणि त्याच्या 10 ते 12 साथीदारांवर कारवाई झाली होती. जामीन मिळाल्यानंतर बुधवारी प्रतिबंधात्मक कारवाईसाठी त्याला इचलकरंजी अपर पोलिस अधीक्षक कार्यालयात आणले गेले होते. येथे हल्लेखोरांची पाळत असल्याचा संशय ओंकारला आल्याने पोलिसांना माहिती दिली. कारवाईनंतर कॉन्स्टेबल जगदीश पाटील यांच्यासोबत दुचाकीवर निघताना सांगली रोडवरील पशुखाद्य दुकानासमोर मागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी जवळून गोळी झाडली. गोळी ओंकारच्या बरगडी आणि पोटात घुसल्याने तो गंभीर जखमी झाला.
पोलिस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेने वाचवले प्राण
हल्लेखोरांनी सांगली दिशेने दुचाकीवर पळ काढला. परिसरातील नागरिकांनी घाबरून दुकाने बंद केली. त्यानंतर ओंकारला कोल्हापूर खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्याची स्थिती चिंताजनक आहे. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपअधीक्षक विक्रांत गायकवाड आणि गावभाग पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांच्या नेतृत्वात श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी तपास सुरू केला. रक्ताचे डाग आणि गोळीची पुंगळी शोधण्यात आली आहे.
सापळा लावून संशयितांना घेतले ताब्यात
पोलिस अधीक्षक गुप्ता यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या पथकाने रेणूका माता मंदिर, नदीवेस नाका परिसरात सापळा लावला. गोपनीय माहितीच्या आधारे अनुराग सूर्यवंशी आणि ओमकार शेंडे यांना ताब्यात घेतले. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिस अधिक तपास करत आहेत. ही कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, वैभव पाटील आणि इतर पथकाने बजावली.
शहरात दहशतीचे वातावरण
इचलकरंजीत असा गोळीबार होण्याची ही पहिलीच घटना असल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. पूर्ववैमनस्य आणि सोशल मीडियावरील धमकीमुळे वाद तीव्र झाल्याचे समोर आले. सांगली नाका ते पाटील मळा मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली होती. पोलिसांनी आणखी साथीदारांचा शोध सुरू ठेवला असून शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
