• Sat. Sep 21st, 2024
कार्ययोद्धा VIDEO, येवल्याची यंत्रणा नाशिकला हलवली,  भुजबळ नाशिकमधून लोकसभेच्या रिंगणात?

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा ही महायुतीकडून भाजप, शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तीनही घटक पक्षांना लढविण्याची इच्छा आहे. नाशिकच्या जागेसाठी या तीनही पक्षांकडून जोरदार रस्सीखेच पाहायला मिळते आहे. मात्र भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेतील वाद बघता ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जाण्याची दाट शक्यता सध्या वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संभाव्य उमेदवार हे मंत्री छगन भुजबळ असू शकतात अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

मागील आठवड्यात मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिकच्या जागी संदर्भात भेट देखील घेतली होती. त्यामुळे स्वतः छगन भुजबळ नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
‘रायगड’च्या बदल्यात नाशिक द्या, शरद पवार गटाचा ठाकरे गटाला प्रस्ताव

दरम्यान, मंत्री छगन भुजबळ हे नाशिक लोकसभा लढतील, अशी चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी छगन भुजबळ यांचा उल्लेख कार्ययोद्धा करत त्यांचा टीजर सोशल मीडियावर पोस्ट केलाय. भुजबळ समर्थकांनी नाशिक लोकसभेचे उमेदवार हे छगन भुजबळच असतील, असे संकेत दिले आहे. त्यामुळे नाशिकच्या उमेदवारीची माळ ही छगन भुजबळ यांच्या गळ्यात पडेल अशी चर्चा सध्या नाशिकमध्ये सुरू आहे.
हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला विरोध, नाशिक लोकसभेसाठी कोणाची लॉटरी लागणार? महायुतीत रस्सीखेच

विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना स्थानिक भाजपकडूनच मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. त्यासोबत भाजपकडून देखील ही जागा कमळावर लढवावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली जाऊ लागली आहे. परंतु भाजपकडे सक्षम उमेदवार नसल्याचा दावा शिंदेंची शिवसेना करत आहे. मात्र शिंदेंच्या शिवसेनेत आणि भाजपात सुरू असलेल्या वादात भुजबळ बाजी मारतील अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. यावेळी कुटुंबातील सदस्याला लोकसभेच्या रणांगणात न उतरवता स्वत: छगन भुजबळ निवडणूक लढवतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्री शिंदेंच्या दारात हेमंत गोडसेंचं शक्तिप्रदर्शन; नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत वादंग

छगन भुजबळ यांची येवल्यातील प्रचार यंत्रणा ही नाशिकला हलवली आहे, अशीही माहिती मिळत आहे. मराठा ओबीसी वादानंतर छगन भुजबळ राज्यभर ओबीसींच्या आरक्षणासाठी मेळावे आणि सभेत ओबीसींची बाजू भक्कमपणे मांडताना पाहायला मिळाले. नाशिक लोकसभा मतदारसंघात मागील तीन पंचवार्षिक निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असा सामना पाहायला मिळाला. मात्र छगन भुजबळ हे ओबीसी नेते असले तरी देखील नाशिकची लोकसभा निवडणूक ही मराठा कार्डवर निर्णायक ठरत असते हे ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed