एलपीजी गॅसच्या पुरवठ्याबाबत सरकारी पातळीवरून सारे काही आलबेल असल्याचे दावे केले जात असले, तरी गॅसवितरकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरातील घरगुती गॅसपुरवठ्यावर सध्या २० ते ४० टक्के परिणाम झाला आहे. भांडुप पश्चिम परिसरात तर भल्या सकाळीच ग्राहकांनी संपलेले गॅस सिलिंडर बदलण्यासाठी रांगा लावल्या होत्या. काही दिवसांपूर्वी सिलिंडरची मागणी केलेल्यांना तुलनेत वेळेवर गॅस मिळत असला, तरी अचानक गॅस संपलेल्या ग्राहकांना मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
ठाणे शहरात पाइपद्वारे गॅसपुरवठा होत असलेल्या भागांमध्ये नागरिकांना समस्या उद्भवत नसली तरी एलपीजीवर अवलंबून असलेल्यांना तुडवड्याचा फटका बसत आहे. नवी मुंबई शहरामध्ये सिलिंडर बुक केलेल्या ग्राहकांना तो वेळेत मिळत नसल्याने चिंता वाढली आहे. अनेक ग्राहक याबाबत विचारणा करण्यासाठी एजन्सीच्या कार्यालयात जात आहेत.
घरांमध्ये सध्या शेगड्या मंदावल्या असताना छोट्या खानावळी आणि रस्त्यावरील वडापाव किंवा तत्सम पदार्थांच्या गाड्यांनाही याचा फटका बसला आहे. पश्चिम उपनगरांमधील काही खानावळी गॅसपुरवठ्याअभावी बंद करण्याची वेळ आली आहे. इंधनपुरवठा सुरळीत न झाल्यास हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तर, काही रेस्टॉरंटनी उपलब्ध गॅस पुरवून वापरण्यासाठी आपल्या पदार्थ यादीतील अनेक पदार्थ कमी केले आहेत. शक्यतो तळलेले पदार्थ न देण्याकडे हॉटेलांचा कल आहे.
‘गॅसतुटवड्यामुळे आम्हाला आमच्या रेस्टॉरंटमधील सुमारे ५० टक्के पदार्थ कमे करावे लागले आहेत. त्याचबरोबर ऑनलाइन फूड डिलिव्हरी सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सध्या आमच्याकडे असलेला गॅससाठा जास्तीत जास्त आणखी एक दिवसच पुरेल’, असे फोर्ट परिसरातील ‘पंचमपुरीवाला’ या रेस्टॉरंटचे मालक अनुपम शर्मा यांनी सांगितले. तर, ‘ज्या हॉटेलांना पाइपने गॅसपुरवठा होतो, त्यांचा कारभार सध्या सुरळीत सुरू आहे. मात्र सिलिंडरवर चालणाऱ्या हॉटेलांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे’, असे विलेपार्ले येथील जीवन हॉटेलचे विद्येश जोगळेकर यांनी नमूद केले. ‘मुंबईत बहुतांश हॉटेल हे व्यावसायिक गॅस सिलिंडवर अवलंबून आहेत. साधारणपणे केवळ २० टक्के हॉटेलांमध्येच पीएनजी आणि इंडक्शनसारखे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, एकूण हॉटेल क्षेत्राची व्याप्ती पाहता बहुतांश पंचतारांकित हॉटेल, रेस्तराँ, रेस्टो पब, छोटे हॉटेल हे गॅस सिलिंडवरच चालतात. त्यांच्यासमोर आता अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिक आणि कामगारवर्ग चिंतेत आहे’, असे ‘हॉटेल अँड रेस्तराँ असो. वेस्टर्न इंडिया’चे विजय शेट्टी यांनी सांगितले.