मुलाला घट्ट मिठी
वणीची लेक आणि चंद्रपूरच्या सूनबाई काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर दिल्लीहून परतल्यावर नागपुरात जंगी स्वागत करण्यात आलं. प्रतिभाताईंची त्यांच्या मैत्रिणी, कुटुंबीय, सहकारी महिला पदाधिकारी-कार्यकर्तींनी गळाभेट घेतली. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. अगदी लेकानेही त्यांना गच्च मिठी मारली असता दोघांच्या डोळ्यात आसवं दाटून आली. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक निर्णयात मला त्यांची उणीव जाणवणार आहे, असं सांगताना प्रतिभाताईंनी आवंढा गिळल्याचं कोणाच्याही नजरेतून सुटलं नाही.
विजय वडेट्टीवार यांचे आभार प्रदर्शनात नाव नाही
माझे पती दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या २०१९ सालच्या निवडणुकीतही अशाच प्रकारचा संघर्ष झाला होता. संघर्षानंतर ते विजयी झाले, १० महिन्यांपूर्वी त्यांचं दुर्दैवी निधन झालं. आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया मॅडम, राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, प्रभारी चेन्निथला जी, आपले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, मुकुल वासनिक, शिवाजीराव मोघे, वामनराव कासावर, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, सुधाकर अडबाले सर, सुनील भाऊ केदार, नितीन जी राऊत, महाविकास आघाडीतील सगळे घटकपक्ष, आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, आदरणीय उद्धवजी ठाकरे, तळागाळातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी… अशी नावांची अख्खी यादीच प्रतिभा धानोरकर यांनी आठवून-आठवून सांगितली. परंतु विरोधीपक्ष नेतेपद भूषवणारे ज्येष्ठ नेते आणि चंद्रपूरचे वजनदार व्यक्तिमत्त्व विजय वडेट्टीवार यांचं नाव घेणं प्रतिभाताईंनी टाळल्याची चर्चा होती.
लढाई कठीण, समोर तगडा उमेदवार
पतीच्या निधनानंतर ही जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. त्यांनी सर केलेला हा गड मी कायम राखीन, हा विश्वास मला वाटतो. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे राजकारणातले दिग्गज नेते माझ्यासमोर आहेत. राजकारणाचा दांडगा अनुभव त्यांना आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही लढाई सोपी नाही. ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी लढाई आहे. संघर्षाशिवाय माणूस मजबूत होत नाही. जितना संघर्ष बडा, उतनी लढाई शानदार, असं मी स्टेटस ठेवलं होतं. ही लढाई वैयक्तिक नाही. राजा बोले प्रजा हाले असा काँग्रेस पक्ष नाही, असंही प्रतिभाताई म्हणाल्या.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
विजय वडेट्टीवार यांच्याविषयी प्रश्न विचारला असता, त्या म्हणाल्या की पक्षाची काही ध्येयधोरणं आहेत. आमचा पक्ष लोकशाहीवर, राज्यघटनेवर चालणारा आहे. त्यांना उमेदवारी मिळाली असती, तर पक्षश्रेष्ठींनी जो आदेश दिला असता, तो मी फॉलो केला असता, मला उमेदवारी मिळाली, तर तो आदेश तेही फॉलो करतील. तळागाळातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी पालन करतील. आमदार, खासदार, माजी मंत्री सर्व जण येतील. विरोधीपक्ष नेते या नात्याने मी त्यांनाही आमंत्रित करणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.