• Sat. Mar 7th, 2026
    Anna Hazare: जग युद्धाच्या उंबरठ्यावर, भारताने शांततेसाठी पुढाकार घ्यावा; अण्णा हजारे यांचे पीएम मोदींना पत्र

    जागतिक स्तरावर वाढत चाललेल्या युद्धांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. भारताने जागतिक शांततेसाठी पुढाकार घेऊन ‘शांततेचे नेतृत्व’ करावे, अशी मागणी अण्णा हजारेंनी केली आहे.

    अण्णा हजारे यांचे पंतप्रधान मोदींना जागतिक शांततेसाठी पत्र(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर: जगाच्या नकाशावर सध्या युद्धाचे सावट गडद होत असताना, भारताच्या अहिंसक परंपरेची आठवण करून देत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साद घातली आहे. केवळ प्रेक्षक बनून न राहता, जगातील वाढत्या संघर्षात भारताने आता ‘शांततादूत’ म्हणून पुढाकार घेण्याची हीच ती वेळ आहे, अशी ठाम मागणी करत अण्णांनी जागतिक राजकारणात भारताच्या नैतिक शक्तीचा वापर करण्याची कळकळीची विनंती केली आहे. त्यांचं हे पत्र सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आलं आहे.

    भारताची परंपरा ही अहिंसा, सत्य आणि शांततेची राहिली

    अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटले आहे की, युद्धामुळे केवळ विनाश, मृत्यू आणि अस्थिरता निर्माण होते. युद्धात सर्वाधिक बळी हा निष्पाप नागरिकांचा जातो. त्यामुळे जगात वाढत चाललेल्या संघर्षांमध्ये संवाद आणि शांततेचा मार्ग शोधणे अत्यंत गरजेचे आहे. भारताची परंपरा ही अहिंसा, सत्य आणि शांततेची राहिली आहे. त्यामुळे भारताने केवळ प्रेक्षकाची भूमिका न घेता जागतिक स्तरावर शांततेसाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

    संवादातून शांततेचा मार्ग

    भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून अनेक देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवतो. त्यामुळे भारताने आपली नैतिक ताकद आणि राजनैतिक प्रभाव वापरून युद्धग्रस्त देशांमध्ये संवादाचे पूल उभे करावेत, अशी अपेक्षा अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. युद्धातून कधीच कायमस्वरूपी समाधान मिळत नाही, तर संवादातूनच स्थैर्य आणि शांततेचा मार्ग सापडतो, असेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले.

    Maharashtra TimesRaigad Accident : नुकताच जुळ्या बाळांचा बाप झाला, स्टेटस ठेवलं, घरी जाऊन आनंद साजरा करण्याआधीच वनरक्षक पित्याचा दुर्दैवी अंत; रायगडमध्ये हळहळ

    भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेचे नेतृत्व करावे

    जागतिक तणाव वाढत असताना भारताने तटस्थ, संयमी आणि जबाबदार भूमिका घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेचे नेतृत्व करावे, असे आवाहन अण्णा हजारे यांनी पंतप्रधानांना केले आहे. त्यांच्या या पत्रामुळे पुन्हा एकदा भारताने जागतिक शांततेत मोठी भूमिका बजावावी, अशी चर्चा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सुरू झाली आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा