महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे जाते. मात्र, विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्याबद्दल असलेल्या नाराजीमुळे भाजपने त्यावर हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. सेनेच्या वतीने भाजपच्या धनंजय महाडिक अथवा समरजित घाटगे यांना उमेदवारी द्या; अथवा जागा तरी द्या असा आग्रह सुरू आहे. म्हणजे उमेदवार, पक्ष आणि चिन्ह या वादात महायुतीची ही जागा अडकली आहे. शिंदे गटात प्रवेश करताना उमेदवारीचा दिलेला शब्द पाळा हा मंडलिकांचा आग्रह आहे. तसे न झाल्यास बंडखोरी करण्याचा इशारा खासदार या गटाने दिला आहे. यामुळे सध्या तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या उमेदवारीचा जोरदार आग्रह धरला आहे.
महायुतीच्या प्रचारात पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह दोन आमदार, माजी आमदारही उतरणार आहेत. त्यामुळे नेत्यांचा विचार करता कागदावर ही युती अतिशय बळकट आहे; पण उमेदवारीचा घोळ मिटत नसल्याने सध्या तरी सारे काही आलबेल नसल्याचे दिसत आहे.
मतदानाला अजून महिन्यापेक्षा अधिक कालावधी शिल्लक असल्याने काहीही राजकीय घडामोडी होऊ शकतात. राधानगरी, भुदरगड, कागल, आजरा, चंदगड, गडहिंग्लज या तालुक्यांत महायुतीची ताकद मोठी आहे. सारे नेते या युतीमध्ये आहेत. त्याचा फायदा निश्चितपणे होणार आहे. महाविकास आघाडीची तीन विधानसभा मतदारसंघांत चांगली ताकद असली, तरी इतर तीन मतदारसंघांत स्थिती बिकट आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे तब्बल पाच आमदार आहेत, म्हणून तर ही जागा काँग्रेसने आपल्याकडे हक्काने घेतली आहे. काँग्रेसला १९९९ नंतर प्रथमच हात चिन्हावर लढण्याची संधी या मतदारसंघात मिळत आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ठाकरे व शरद पवार गटाची शक्ती विभागली गेली आहे. त्यामुळे त्यांना सोबत घेऊन लढण्याचे मोठे आव्हान काँग्रेसमोर असणार आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोल्हापुरात शाहू महाराजांची भेट घेतली. प्रचाराला आणि विजयी सभेलाही येण्याची ग्वाही दिली. यातून शिवसेना एकदिलाने महाराजांच्या प्रचारात उतरणार असा संदेश दिला गेला. ही निवडणूक कोल्हापूरच्या प्रश्नावर होण्याची शक्यता फारच कमी आहे. कोल्हापुरात कोणाला विजयी करायचे यापेक्षा कुणाला पाडायचे हे अगोदर ठरते. त्यातून हवा पालटत जाते. अजून मैदानातील पैलवान ठरणार आहेत. त्यामुळे कुस्ती महाराज विरोधात मंडलिक की राजे होणार का तिसरा पैलवान शड्डू ठोकणार हे लवकरच निश्चित होणार आहे.