भूमी अभिलेख विभागाने तलाठी भरती परीक्षेची अंतिम निवड यादी नुकतीच जाहीर केली. त्यानुसार, ३६ जिल्ह्यांमधील चार हजार २१९ पदांसाठी याद्या प्रसिद्ध झाल्या. निवड यादीत अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये वर्ग एक ते वर्ग तीन पदांसाठी निवड झालेले अनेक उमेदवार आहेत. तलाठी ग्रामस्तरावरील महसूल विभागाचे शेवटचे पद आहे. ‘वर्ग एक’च्या पदासाठी निवड झालेला कोणताही उमेदवार हे पद स्वीकारणार नाही. मात्र, अशा निवड झालेल्या उमेदवारांनी तलाठी पदासाठी कागदपत्रांची पडताळणी; तसेच प्राधान्यक्रमदेखील संबंधित जिल्हा निवड समितीकडे सादर केले. तलाठी पद स्वीकारणार नसल्याने या उमेदवारांनी पडताळणी आणि प्राधान्यक्रम दिल्याने ही पदे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांसाठी अडकली आहेत.
त्यामुळे काही उमेदवार आता आपल्या नंतरच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संपर्क करीत आहेत. ‘तुमच्यासाठी तलाठी पद सोडतो, पण पाच लाख रुपये द्या,’ अशा स्वरूपाची मागणी त्यांनी केल्याचे भूमी अभिलेख विभागाच्या निदर्शनास आला आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवार हवालदिल झाले आहेत. नोकरीसाठी पाच लाख रुपयांची जुळवाजुळव कशी करावी हा प्रश्न त्यांना सतावत आहे.
या संदर्भात अनेक उमेदवारांनी भूमी अभिलेख विभागाशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. उमेदवार जागांवरील हक्क सोडत नाहीत, तोपर्यंत काहीही सांगता येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तलाठी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी पदाची नियुक्ती स्वीकारावी किंवा नाही हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मात्र, उमेदवारांची नियुक्ती झाल्यानंतर रिक्त पदांचा संदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे आवाहन भूमी अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी केले आहे.