महाविकास आघाडीच्या जागावाटपात हातकणंगले मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला मिळाला आहे; पण ताकद नसल्याने शेट्टींना बळ देण्याची या पक्षाची मानसिकता दिसत आहे. त्यांनी शिवसेना पुरस्कृत उमेदवारी घ्यावी ही त्यांची इच्छा आहे. ज्याला ते तयार नाहीत. दोन वेळा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली; पण अजूनही निर्णय होत नसल्याने त्यांच्या अडचणी वाढत आहेत. पाठिंबा देण्यापेक्षा उमेदवार उभे करण्यासाठी सेनेची चाचपणी सुरू आहे, यातून माजी आमदार सुजित मिणचेकर, सत्यजित पाटील यांची नावे पुढे केली जात आहेत. शिवसेनाच नव्हे; तर महाविकास आघाडीच्या कोणत्याच पक्षाकडे सध्या तरी तगडा उमेदवार नाही. माजी मंत्री जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक यांनी मैदानात उतरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. स्वाभिमानी संघटनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना महायुतीची शिकार करायची आहे. याला खांदा द्यायला शेट्टी तयार असले, तरी त्यांना आघाडीचा शिक्का नको आहे. यामुळे आता ते पाठिंबा घेणार, पुरस्कृत उमेदवारी घेणार की स्वतंत्र लढणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.
आघाडीप्रमाणेच महायुतीच्या उमेदवारीचे कोडेही सुटलेले नाही. ही जागा शिंदे गटाकडे आहे. खासदार माने प्रचाराला लागले आहेत; पण त्यांच्याविषयी नाराजी असल्याचे सांगून त्या जागेवर भाजप हक्क सांगत आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, प्रकाश आवाडे यांची नावे पुढे केली जात आहेत. राहुल आवाडे, संजय पाटील यड्रावकर, संजय एस. पाटील व सदाभाऊ खोत हेदेखील उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. जागा भाजपला की शिंदे गटाला यावरच उमेदवारी अवलंबून राहणार आहे. शेट्टी हे मैदानात उतरणार हे निश्चित आहे. फक्त ते स्वतंत्र की आघाडीच्या पाठिंब्यावर एवढाच प्रश्न आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये ही जागा भाजप लढवणार की शिंदे गट याचा फैसला लांबणीवर पडत आहे. त्यानंतर उमेदवारीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
शिंदे गटात आलेल्या सर्व खासदारांना उमेदवारी हा निर्णय झाल्यास मानेंना तिकीट मिळण्यात अडचणी नाहीत; पण त्यांच्याविषयी असलेल्या नाराजीचे काय करायचे याबाबत महायुती काय करणार हे महत्त्वाचे आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ही निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी यावरच शेट्टी यांचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे. हे होऊ नये म्हणून ते एक पाऊल मागे घेणार की ठाकरे गट हे लवकरच स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.