मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या वेळापत्रकामुळे सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि विशेषतः पोलिसांच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. महाराष्ट्रातील पाच टप्प्यांतील निवडणूक एप्रिल आणि मे अशा सुट्ट्यांच्या दोन महिन्यांतच होऊ घातल्याने ‘निवडणूक कर्तव्या’मुळे या सुट्ट्यांवर गदा येणार आहे. आगाऊ बेत आखणाऱ्या अनेक सरकारी अधिकारी-पोलिसांना विमान, रेल्वे; तसेच हॉटेलचे बुकिंग रद्द करावे लागले आहे.एप्रिल आणि मे महिन्यात मुलांना उन्हाळी सुट्ट्या असल्याने अनेक जण पर्यटनाचे बेत आखतात. यावर्षी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांसाठी एप्रिल आणि मे या सुट्टीच्या महिन्यांचीच निवड केल्यामुळे सरकारी, पालिका अधिकारी-कर्मचारी, पोलिसांची अडचण झाली आहे. राज्यात १९ एप्रिल ते २० मे या कालावधीत पाच टप्प्यांत मतदान व जूनच्या पहिल्या आठवड्यात निकाल आहे. १५ एप्रिलपर्यंत मुलांच्या सुट्ट्या सुरू होतात व जूनच्या दुसऱ्या आठवड्यात शाळा पुन्हा सुरू होतात. याच कालावधीत नेमके मतदानाचे टप्पे ठेवल्याने सर्वांचीच अडचण झाली आहे. पर्यटनाबरोबरच, लग्न सोहळे तसेच इतर कार्यक्रम मुख्यत्वे याच सुट्ट्यांच्या महिन्यात आयोजित केले जातात. अनेकांनी यासाठी आधीपासूनच नियोजन करून विमान, रेल्वेचे तिकीट, हॉटेल बुकिंग केले आहे. मात्र, निवडणुकीच्या कामातून सुट्टी मिळणार नसल्याने अनेकांनी बेत रद्द करून बुकिंग रद्द करण्यास सुरुवात केली आहे. मतदानाच्या तारखा वगळून काही दिवस सुट्टी मिळेल या आशेवर काही जण आहेत.
पालिकेतील एका कर्मचाऱ्याने कुटुंबातील लग्नासाठी प्रथम कोकणात व नंतर गोव्याला जाण्याचे ठरवले होते. पण निवडणूक कामाला सुट्टी मिळणे अशक्य असल्याचे तो म्हणाला. एका सरकारी अधिकाऱ्याने देवदर्शनासाठी खासगी वाहनही आरक्षित केले आहे. मात्र, निकाल लागेपर्यंत ड्युटीतून सुटका होईल, असे वाटत नसल्याचे हा अधिकारी म्हणाला.
पोलिस निरीक्षकाचा बेत रद्द
‘मुलीच्या दहावीच्या परीक्षेनंतर आम्ही दक्षिण भारतात फिरण्यासाठी जाणार होतो. सण, समारंभामुळे सुट्ट्या मिळत नसल्याने मे महिन्यात हा बेत ठरला होता. १५ मेपर्यंत निवडणूक संपेल, असे वाटले होते; परंतु आता बुकिंग रद्द करावे लागणार आहे,’ असे एका पोलिस निरीक्षकाने सांगितले.