• Sat. Sep 21st, 2024

दुर्मीळ आजाराने ग्रस्त, हाताच्या विच्छेदनाचा सल्ला, मुंबईच्या डॉक्टरांकडून ३ आठवड्यांच्या बाळाला जीवनदान

दुर्मीळ आजाराने ग्रस्त, हाताच्या विच्छेदनाचा सल्ला, मुंबईच्या डॉक्टरांकडून ३ आठवड्यांच्या बाळाला जीवनदान

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : दुर्मीळ प्रकाराच्या सेल्यूलायटिस आजाराने ग्रस्त असलेल्या तसेच संसर्ग झालेल्या एका बाळाच्या त्वचेवर गँगरिन झाल्यामुळे हाताची त्वचा काळी पडू लागली होती. हाताला झालेल्या संसर्गानंतर हाडांमधील उती नष्ट होण्याची शक्यता होती. त्यामुळे या बाळाचा हाताचे विच्छेदन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र लहान मुलांसाठीच्या बाई जेरबाई वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी या बाळाचा हात न कापता त्याला व्याधीमुक्तही केले.नेपाळमधील या बाळावर जन्मानंतर काठमांडू येथे वैद्यकीय उपचार झाले. नेपाळमध्ये अतिदक्षता विभागामध्ये असताना त्याला गंभीर स्वरूपाच्या सेल्यूलायटिसचे निदान झाले. त्यामुळे या बाळाच्या डाव्या हाताला संसर्ग झाला होता. हाताची त्वचा काळी पडली आणि त्याची प्रकृती खालावली. वडिलांनी बाळाला काठमांडूतील मोठ्या रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे त्यांना या बाळाच्या डाव्या हाताचे विच्छेदन (अँम्पूटेशन) करण्याचा सल्ला देण्यात आला. यानंतर त्याचे पालक त्याला मुंबईमध्ये घेऊन आले. तीन आठवड्यांच्या या बाळास २५ फेब्रुवारी रोजी परळ येथील बाई जेरबाई वाडिया रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

प्लास्टिक सर्जरीतज्ज्ञ डॉ. नीलेश सतभाई यांनी दिलेल्या माहितीनुसार या बाळाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. सेल्यूलायटिस हा एक जीवाणूजन्य संसर्ग आहे जो त्वचेच्या आतील थरांमध्ये होतो. त्यामुळे शरीरावर लालसर, सूज दिसून येते. काहीवेळा वैद्यकीय उपचारांना दाद न दिल्याने सेल्यूलायटिसचा संसर्ग वाढून जीवघेणी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे मुलांच्या त्वचेवरील मांसल भाग कमी होतो. त्यामुळे गँगरिन होण्याची शक्यताही वाढते

असे झाले उपचार

या बाळाची तपासणी केल्यानंतर त्वरित हात वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. संसर्गामुळे झालेल्या जखमा स्वच्छ करून सर्व मृत उती काढून टाकण्यात आल्या. संसर्ग आटोक्यात आणण्यात आला. विविध टप्प्यांत जखमा बऱ्या करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. बाळ फक्त एक महिन्याचे असल्यामुळे मोठ्या शस्त्रक्रियेसाठी त्याला भूल देणेही आव्हानात्मक होते. बाळाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर पाच आठवड्यांच्या कालावधीमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या. वेळीच शस्त्रक्रिया केल्यामुळे बाळाचा हात वाचवता आला. मूल मोठे झाल्यावर पुन्हा काही शस्त्रक्रियांची गरज भासू शकेल.

मुंबईने आधार दिला…

मुंबईमध्ये कायम उत्तम रुग्णसेवा दिली जाते. काठमांडूतील सर्वात मोठ्या रुग्णालयातदेखील आम्हाला हाताचे विच्छेदन करण्याचा सल्ला देण्यात आला. तेव्हा आम्ही सर्व आशा गमावल्या होत्या. मात्र इथे तो आधार मिळाला, अशी भावना या बाळाच्या पालकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed