• Mon. Nov 25th, 2024
    दोन गटात वाद, क्षुल्लक कारणावरुन घरासमोरच छातीत चाकू भोसकून हत्या; ठाण्यात खळबळ

    ठाणे : ठाणे जिल्ह्यात कल्याण पूर्वेत चेतना ते आडीवली परिसरात दोन गटात झालेल्या वादाचे पर्यावसण रक्तरंजीत राड्यात झाल्याची धक्कादायक घटना काल सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. तरुणांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले आहेत. एका तरुणाने दुसऱ्या तरुणाला आवाज देत थांबण्यास सांगितले. तो तरुण आवाज ऐकूनही थांबला नाही. त्यामुळे त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला आहे.कल्याण पूर्वेतील जय मल्हार हॉटेलसमोर काही तरुण उभे होते. याचदरम्यान प्रेम भोवाड हा तरुण त्याचा मित्र यश गुप्ता आणि राहूल केणेसोबत जात होता. या तिघांना जनकल्याण खासगी रुग्णालयात जायचे होते. मात्र, जय मल्हार हॉटेलसमोर उभे असलेल्या तरुणांनी या तिघांना थांबण्यास सांगितले. तिघेही थांबले नाही. ते रुग्णालयात गेले. रुग्णालयातून ते तिघे पुन्हा त्याच रस्त्याने येत असताना योगेश पटेल जो बांधकाम व्यावसायिक आहे. याने त्याचा मित्र राहूल पाठक, संतोष यादव यांच्यासह प्रेम आणि यश या दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. कसेबसे यश गुप्ता हा त्यांच्या तावडीतून सूटून घरी पळाला.
    मोठी बातमी : एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना जन्मठेप

    योगेश पटेल याने त्याच्या साथीदारांना घेऊन यशचे घर गाठले. घरासमोरच यशच्या छातीत चाकू भोसकला. यावेळी यशचा भाऊ जिगर हा मध्यस्थी करण्यासाठी आला असता त्याच्या मानेवारही चाकूने प्रहार करुन त्याला गंभीर जखमी केले. या घटनेत यश गुप्ता याचा जागीच मृत्यू झाला आहे. या हाणामारीत आरोपी योगेश पटेल आणि त्याचा साथीदार संतोष यादव हा देखील जखमी झाला आहे. या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र, एका किरकोळ कारणातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

    सध्या चेतना ते आडीवली परिसर हा वादग्रस्त ठरत आहे. रात्रीच्या वेळी टोळक्यांची या रस्त्यावर गर्दी असते रात्री भर रस्त्यात या टोळक्यांचा धिंगाणा सुरु असतो. अनेकदा दारूच्या नशेत या टोळक्याकडून रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. रात्री अपरात्री दहशत पसरवणारया टोळक्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *