माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे मंगळवारी सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात संकल्प सभेसाठी आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर टीका केली. सोलापूर मतदारसंघात काँग्रेसकडून अद्याप उमेदवार जाहीर केलेला नसला तरी प्रणिती शिंदे यांच्याकडून प्रचाराला सुरूवात करण्यात आलेली आहे.
सुशीलकुमार शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी सोलापुरातील बोरोटी गावात असताना असाच एक गौप्यस्फोट केला होता. मला आणि प्रणितीला भाजपकडून अनेकदा ऑफर होती, असं ते म्हणाले होते. त्यांच्या वक्तव्यानंर काहीच दिवसांत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सोलापुरातूनही सुशीलकुमार शिंदे भाजपमधील जातील का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांना गावागावात जाऊन भाजपमध्ये जाणार नाहीत, असा खुलासा करण्याची वेळ आली.
सोलापूर लोकसभेचा काँग्रेसचा उमेदवार अजून जाहीर नाही, प्रचार मात्र जोमात
सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसने अद्यापही उमेदवार अधिकृतपणे जाहीर केला नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रणिती शिंदेना सोबत घेऊन सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचार देखील सुरू केला आहे. सोमवारी सायंकाळी सोलापूर शहरात काँग्रेसने दोन संकल्प मेळावे आयोजित केले होते. या मेळाव्यात सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार प्रणिती शिंदे यांनी गावागावात भेटीगाठी सुरू केल्या असून गावागावात जाऊन मी भाजपमध्ये जाणार नाही असे सांगत आहेत. भाजपला मतदान करू नका असे आवाहनही करत आहेत. प्रणिती शिंदे व सुशीलकुमार शिंदे यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचार उमेदवारीआधीच सुरू केला आहे.