• Mon. Mar 16th, 2026

    Solapur Accident: जीवलग मित्र चहा प्यायला गेले, पण भीषण अपघातात जागीच मृत्यू; कारचा चेंदामेंदा, कुटुंबाचा आक्रोश

    Solapur Accident: जीवलग मित्र चहा प्यायला गेले, पण भीषण अपघातात जागीच मृत्यू; कारचा चेंदामेंदा, कुटुंबाचा आक्रोश

    Solapur News: या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, दोघांचे मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत सोलापूर विजयपूर महामार्गावर पडले होते.

    जीवलग मित्र चहा प्यायला गेले, पण भीषण अपघातात जागीच मृत्यू; कारचा चेंदामेंदा, कुटुंबाचा आक्रोश(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सोलापूर: सोलापूर-विजयपूर महामार्गावर असलेल्या बायपास रोडवर शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. सोलापूर शहरातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. रोजा इफ्तारनंतर दोन्ही मित्रांनी चहाचा बेत केला होता. नवीन वाहन विकत घेतल्याने फेरफटका मारण्यासाठी इमामुद्दीन बागवान आणि अमन बागवान दररोज सांयकाळी रोजा इफ्तार झाल्यानंतर चहा पिण्यासाठी वाहन घेऊन जात होते. शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मात्र दोघा मित्रांवर काळाने झडप घातली.

    इमामुद्दीन जियाउल्ला बागवान(वय 18 वर्षे,रा,रंगराज नगर,हैदराबाद रोड, सोलापूर) अमन निसार बागवान(वय 19 वर्षे,रा,रंगराज नगर,हैदराबाद रोड ,सोलापूर) हे दोघे जिवलग मित्र चहा पिऊन कारमधून घरी निघाले होते. बायपास रोडवर मात्र दोघा मित्रांच्या कारला कंटेनरने चिरडले.

    रमजान सणाचा उत्साह असताना बागवान कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर
    मुस्लीम धर्मीयांतील सर्वात मोठा सण म्हणजे रमजान सण आहे. तब्बल एक महिनाभर रोजे (उपवास) करून मुस्लीम धर्मीय बांधव रमजान सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. बागवान कुटुंबीयांनी देखील रमजान सणाची तयारी केली होती. इमामुद्दीन बागवान व अमन बागवान या दोघा मित्रांच्या वडिलांचे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिर्चीचा व्यापार आहे. मोठे व्यापारी म्हणून यांची ओळख आहे. इमामुद्दीन बागवान आणि अमन बागवान या दोघांच्या घरात 21 मार्च रोजी साजरा होणाऱ्या रमजान सणाची मोठी तयारी केली होती. मात्र आता आनंदाच्या वातावरणात अपघातामुळे बागवान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    कुटुंबीयांचा शासकीय रुग्णालयात आक्रोश
    घटनेची माहिती मिळताच सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेमुळे मार्केट यार्ड परिसरात आणि सोलापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. इमामुद्दीन बागवान आणि अमन बागवान या मित्रांचे मृतदेह सोलापूर विजयपूर महामार्गावर छिन्नविच्छिन्न अवस्थेत पडले होते. इमामुद्दीन आणि अमनचे मृतदेह पाहून शासकीय रुग्णालयात नातेवाईकांनी हंबरडा फोडला.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा