• Sat. Sep 21st, 2024
दिलीप मोहितेंची तलवार म्यान, आढळराव पाटील यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या घोषणा झाल्या मात्र अद्याप काही मतदारसंघात उमेदवार निश्चित झालेले नाही. यामधील एक आहे शिरूर लोकसभा मतदारसंघ. शिरूरच्या जागेवरून महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये संघर्ष सुरू होता. मात्र दिलीप मोहिते पाटील यांनी आपली तलवार म्यान केल्यामुळे आढळरावांचा उमेदवारीचा मार्ग मोकळा झालेला आहे. पक्ष हितासाठी आपण एक पाऊल मागे घेत आढळराव पाटील यांना आपण पाठिंबा देणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता अमोल कोल्हे यांच्या पुढे आढळरावांचं आव्हान असेले हे निश्चित झालेले आहे.शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजी आढळराव पाटील यांनी शिवसेना पक्षातून खासदारकीची जागा लढवण्याची तयारी केली आहे. परंतु अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पक्षातून त्यांना विरोध होत होता. शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी मिळाली तर मी वेगळा विचार करत विरोधात काम करेल, अशी भूमिका खेडचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी घेतली होती. मी शिवाजीराव आढळराव पाटलांसोबत गेले २० वर्ष संघर्ष करत आहे. त्यांना पाठिंबा देण्यापेक्षा घरी बसेन, अशी भूमिका मोहिते यांनी घेतली होती. मात्र अजित पवार यांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी एक पाऊल मागे घेतले आहे.
अजितदादांची धमकी, निलेश लंके मार्ग काढण्यासाठी शरद पवारांच्या भेटीला, तिकीट फायनल?

“आज मुंबईमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाची बैठक पार पडली. नेत्यांनी बैठकीमध्ये सर्वांचे मते जाणून घेतली. खरं म्हणजे हे वस्तुस्थिती आहे की, आढळराव पाटलांच्या उमेदवारीला माझा विरोध होता. तरीही नेत्यांचा आग्रह आहे की आपल्याला आढळराव पाटलांना उमेदवारी देणे फायद्याचे ठरणार आहे. शेवटी पक्षाचा फायदा एखाद्या गोष्टीने होणार असेल तर माझ्या भावना आणि मत मी बाजूला ठेवण्याचा विचार या निमित्ताने केला आहे. हे सर्व करताना कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावं आणि ही सर्व प्रचाराची सूत्रे वळसे पाटील यांच्याकडे द्यावीत, त्यांच्या नेतृत्वात मी काम करायला तयार असल्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडली” असं दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितलं

अंतर्गत कलह मिटल्यानंतर आता खासदार अमोल कोल्हे यांना महायुतीचं तगडं आव्हान असणार आहे. मोहितेंच्या विरोधामुळे अमोल कोल्हे यांना निवडणूक सोपी जाईल, अशी चर्चा होती, परंतु महायुतीतील वाद मिटल्यानंतर कोल्हे यांना नवे डावपेच आखावे लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed