• Sat. Sep 21st, 2024
आंतरराष्ट्रीय सीमा सील, सुराबर्डीत तस्करांकडून गोदामांतून सुपारी चोरी..

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : आंतरराष्ट्रीय सीमा सील झाल्याने तस्करांनी गोदामात सीलबंद असलेल्या सडक्या सुपारीवर लक्ष केंद्रित केले आहे. तस्करांकडून आता गोदामांचे सील फोडून सुपारी चोरी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाडीच्या सुराबर्डीत अशी घटना पुढे आली. याप्रकरणी वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.डिसेंबर महिन्यात अन्न व औषध प्रशासनाने वाडीच्या सुराबर्डी येथील गोपाल अग्रवाल यांच्या गोदामावर छापा टाकला. विभागाने १८४ पोती सडकी सुपारी जप्त केली.

याशिवाय, अन्य ठिकाणांहून जप्त सुपारीची पोतीही या गोदामात ठेवण्यात आली. सुमारे ७०० पोती सुपारी जमा करून गोदामाला सील लावण्यात आले. याच्या सुरक्षेची जबाबदारी व्यवस्थापक सोहनलाल चव्हाण यांच्याकडे होती.
कापूस, तुरीचे दर कडाडले, ९ हजारांचा उच्चांक गाठणार?
यादरम्यान या गोदामातून एकामागून एक तब्बल ५०६ पोती सडकी सुपारी गायब झाली. रविवारी विभागाचे अधिकारी ललित सोयाम यांनी गोदामाची आकस्मिक पाहणी केली.

गोदामातील एकूण सुपारींच्या पोत्यांपैकी तब्बल ५०६ पोती गायब असल्याचे आढळून आले. सोयाम यांनी चव्हाण यांना विचारणा केली. त्यांनी समाधानकार उत्तर दिले नाही.

सोयाम यांनी वाडी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी घरफोडीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करोनामध्ये लॉकडाउन लागल्यानंतर म्यानमारसह आंतरराष्ट्रीय सीमा सील करण्यात आल्या. त्यामुळे म्यानमारमधून बांगालादेश ओडिशामार्गे दिल्ली व नागपुरात येणारी सडक्या सुपारींची तस्करी बंद झाली.

शिवाय, केंद्रीय तपास यंत्रणांनीही सडक्या सुपारी तस्करांविरुद्ध फास आवळल्याने नागपुरातील बडे तस्कर भोपाली, कॅप्टन, अन्वर आसिफ गायब झाले. सडक्या सुपारींवर मोठ्या प्रमाणात कारवाई करून ती गोदामात सीलबंद करण्यात आली.

म्यानमारमधून येणारी सुपारी बंद झाल्याने नागपुरात सोनू, टिकू, अनीस, भांज्या, अन्नान, तोसिफ, मुनाफ, सोनू, जावेद, लखानी, समीर बेरा हे सक्रिय झाले.

गोदामाला छिद्र पाडून या तस्करांचे साथीदार सडकी सुपारी चोरी करून ती व्यापाऱ्यांना विकायला लागले. वाडीतील गोदामातूनही चोरी झालेली सुपारी यापैकीच एका तस्कराने व्यापाऱ्याला विक्री केल्याचीही शक्यता सूत्रांनी वर्तविली.

प्रतिबंधित गुटख्याचा ‘राजा’ हैदराबादमध्ये

राज्यात सुगंधित तंबाखू व गुटख्याला बंदी आहे. असे असतानाही नागपुरातील एकेकाळचा बडा सुपारी तस्कर ‘राजा’ हा उपराजधानीत मोठ्या प्रमाणात गुटख्याचा पुरवठा करतो. तस्करीतून जमविलेली माया त्याने हैदराबादमधील कारखान्यात गुंतविली. या कारखान्यात गुटख्याची निर्मिती करून राजा हा नागपूरसह विदर्भातील अनेक शहरांमध्ये तस्करी करतो, अशी माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed