• Mon. Aug 17th, 2026

आर्थिक प्रगतीबरोबरच कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातील प्रगतीही महत्त्वाची- मंत्री चंद्रकांत पाटील

ByMH LIVE NEWS

Mar 12, 2026
आर्थिक प्रगतीबरोबरच कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातील प्रगतीही महत्त्वाची- मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई

 कोणताही समाज कला, क्रीडा आणि साहित्याच्या विकासामुळेच मोठा होत असतो. आर्थिक प्रगतीबरोबरच या क्षेत्रांतील प्रगतीही तितकीच महत्त्वाची आहे. शासनाने प्रदर्शन आणि विविध पुरस्कारांच्या माध्यमातून कला क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली असून पुरस्कारांच्या रकमांमध्येही भरीव वाढ करण्यात आली असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

65 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू हीमकुमार चटर्जी, कला संचालनालयाचे संचालक डॉ किशोर इंगळे, पद्मश्री वासुदेव कामत, ज्येष्ठ शिल्पकार किशोर ठाकूर, आदी उपस्थित होते.

राज्य कला प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले असून यावेळी कला जीवन गौरव पुरस्कार वितरण करण्यात आले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील म्हणाले की, कला संचालनालयाच्या वतीने कलाक्षेत्रातील पदविका परीक्षांना बोर्ड परीक्षेचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या बोर्ड परीक्षांसाठी संचालनालयाशी 200 पेक्षा अधिक संस्था जोडल्या गेल्या आहेत. तसेच सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आणि त्याला यशही मिळाले. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट ही कलाक्षेत्रातील ऐतिहासिक व जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त संस्था असल्याचे त्यांनी नमूद केले.

कलाकारांना ईश्वरीय देणगी लाभलेली असते. त्यांच्या सृजनातून चित्रकला, शिल्पकला यांसारख्या विविध माध्यमांतून भारताचे सांस्कृतिक प्रतिबिंब उमटत असते, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कारांचे वितरण

यावेळी मंत्री पाटील यांच्या हस्ते 2023-24 ते 2025-26 या कालावधीतील वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कारांचे तसेच विविध कला पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

वासुदेव गायतोंडे कला जीवन गौरव पुरस्कार सन 2023-24 साठी शिल्पकार किशोर ठाकूर यांना, 2024-25 चा ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द.फडणीस यांना तर 2025-26 पुरस्कार चित्रकार पद्मश्री वासुदेव कामत यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ व्यंगचित्रकार फडणीस यांच्या वतीने त्यांच्या कन्या रूपा देवधर यांनी स्वीकारला. ज्येष्ठ कलाकार पुरस्कार चित्रकार विलास शिंदे यांना देण्यात आला.

कला जीवन गौरव पुरस्कारासाठी 5 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह, ज्येष्ठ कलाकार पुरस्कारासाठी दीड लाख रुपये व सन्मानचिन्ह, तर विभागीय पुरस्कारांसाठी 75 हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले. या प्रसंगी विभागीय स्तरावरील 15 पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले.

65 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी राज्यभरातून एकूण 1266 कलाकृती दाखल झाल्या होत्या. त्यापैकी 268 उत्कृष्ट कलाकृतींचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि उपस्थित मान्यवरांनी गॅलरीतील प्रदर्शित कलाकृतींची पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed