IRCTC Prepare For LPG Crisis: आधीच जेवण आरक्षित केलेल्या जेवणाचे शुल्क संबंधित प्रवाशांना परत करण्याची तयारीही पूर्ण करण्यात आली आहे. याबाबत अंतिम निर्णय रेल्वे मंडळ आणि रेल्वे मंत्रालय घेेणार आहे.
युद्धामुळे घरगुती गॅस सिलिंडरला प्राधान्य द्यावे, अशा सूचना सरकारने दिल्या आहेत. सद्यस्थितीत व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल उद्योगासह खाणावळी, बेकऱ्या आणि खाद्यपदार्थ तयार करणारे बहुतांश उद्योग थांबले आहेत. एलपीजीचा तुटवडा निर्माण झाल्यास, उपाययोजना करण्यासाठी ‘आयआरसीटीसी’च्या पश्चिम विभागाचे सह महाव्यवस्थापक उमेश नायडू यांनी रेल्वे स्थानकांवरील फूड प्लाझा, रिफ्रेशमेंट रूम आणि जनआहार केंद्रांना खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
LPG Gas Shortage: गॅसटंचाईची धग अधिवेशनाला; आमदारांचे कँटीन बंद, सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
एलपीजी पुरवठ्यात संभाव्य तुटवडा निर्माण झाल्यास त्याची भरपाई करण्यासाठी मायक्रोवेव्ह आणि इंडक्शन यांसारख्या पर्यायी स्वयंपाकपद्धतींचा वापर करावा, तसेच अन्य खाद्यपदार्थांव्यतिरिक्त प्रवाशांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी रेडी टू ईट (आरटीई) खाद्यपदार्थांचा पुरेसा साठा युनिटमध्ये ठेवावा, असे ‘आयआरसीटीसी’ने सांगितले आहे.
‘आयआरसीटीसी’च्या पश्चिम विभागात मुंबई सेंट्रल, पुणे, नागपूर, भुसावळ, वडोदरा, अहमदाबाद, इंदोर, जबलपूर, राजकोट, कोटा यांचा समावेश होतो. या सर्व शहरांमधील कोणत्याही युनिटमध्ये गॅस सिलिंडरच्या अनुपलब्धतेमुळे खाद्यपदार्थ तयार करण्याची प्रक्रिया बंद करावी लागल्यास, तातडीने त्याची माहिती पश्चिम विभागाच्या नियंत्रण कक्षाला द्यावी, असे सांगत, आयआरसीटीसीने हेल्पलाइन क्रमांकही जाहीर केला आहे.
गॅस संपल्याने हॉटेल बंद, वीज व्यवस्थेवरही परिणाम? जयंत पाटलांनी व्यक्त केली मोठी भीती
‘आयआरसीटीसी’च्या मुंबई सेंट्रलस्थित बेस कीचनमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण होत असल्याने रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांसाठी जेवण शिजवताना अडचणी येत आहेत. यामुळे गॅसपुरवठा सुरळीत होईपर्यंत रेल्वेगाड्यांत ‘आयआरसीटीसी’च्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या जेवणाची सुविधा तात्पुरती स्थगित करावी, असा उपाय सुचवण्यात आला आहे.
रनिंग रूमसाठी पुरवठा सुरळीत ठेवा
गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे रेल्वेगाड्यांचे लोकोपायलट, मोटरमन आणि संबंधित कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या रनिंग रूममध्येदेखील अडचणी निर्माण होत आहेत. गॅसपुरवठा पूर्ववत राहण्यासाठी भारतीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांनी पेट्रोलियम मंत्रालयाला पत्र लिहून रनिंग रूममधील एलपीजीचा पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत सूचना केल्या आहेत. मध्य रेल्वेवरील रनिंग रूममध्ये दरमहा ६८२ सिलिंडर आणि पश्चिम रेल्वेवर दरमहा ३०७सिलिंडरची आवश्यकता असते.
