कोल्हापूर : कोल्हापुरातून महाविकास आघाडीतर्फे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि हातकणंगलेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने माजी खासदार राजू शेट्टी लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. या दोघांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार कोण? शेट्टी आघाडीचा पाठिंबा घेणार की स्वतंत्र लढणार? जिल्ह्यातील दोन्ही जागा शिवसेना शिंदे गटाला मिळणार की, भाजपचा दावा खरा ठरणार याची उत्तरे मिळायला वेळ लागणार आहे. राजकीय हालचाली पाहता दोन्ही मतदार संघात तिरंगी नव्हे तर दुरंगी लढत होण्याची चिन्हे अधिक आहेत.कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचार आणि नियोजनाला तब्बल पन्नास दिवस मिळणार आहेत. यामुळे रणधुमाळी तातडीने सुरू होण्याची चिन्हे कमी झाली आहेत. सध्या कोल्हापुरातून महाविकास आघाडीच्या वतीने श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे महायुतीची उमेदवारी आपल्यालाच मिळणार असा दावा खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगलेतून धैर्यशील माने यांनी केला आहे. पण, दोघांच्या उमेदवारीवर टांगती तलवार आहे.
दोन्हीपैकी एक जागा भाजपला मिळावी म्हणून नेत्यांच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी हातकणंगलेतून शौमिका महाडिक, प्रकाश आवाडे तर कोल्हापुरातून धनंजय महाडिक व समरजित घाटगे यांची नावे पुढे केली जात आहेत. यातील कोणता मतदारसंघ भाजपला मिळणार यावरच उमेदवारही निश्चित होणार आहे. जागा न मिळाल्यास भाजपचा नेता धणुष्यबाण चिन्हावर लढविण्यासाठीही हालचाली सुरू आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सध्या तरी ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतली आहे. आघाडीने त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय न झाल्यास शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने माजी आमदार सुजीत मिणचेकर व सत्यजीत पाटील यांना मैदानात उतरवले जाण्याची चिन्हे आहेत. यामुळे तेथे तिरंगी लढत होईल. मंडलिकांना उमेदवारी न मिळाल्यास त्यांच्या गटाने बंडखोरीचा इशारा दिला आहे. पण, राजकीय हालचाली पाहता दोन्ही मतदारसंघात दुरंगीच लढत होण्याची शक्यता अधिक आहे. यातील शाहू महाराज व राजू शेट्टी यांची उमेदवारी निश्चित असून फक्त त्यांची लढत कोणाशी होणार एवढाच प्रश्न सध्या शिल्लक आहे.